शहापूरच्या जलवाहिनीला गळती दुरुस्तीचे काम सहा तासात उरकले

नगराध्यक्षा, पाणी पुरवठा सभापतींच्या तत्परतेमुळे तात्काळ दुरुस्ती

सातारा, दि. 9 (प्रतिनिधी)- शहराला पाणी पुरवठा करणा-या शहापूर उदभव योजनेच्या जलवाहिनीला जकातवाडीनजिकच्या क्रीडा संकुलाच्या पाठीमागे असलेल्या शेतामध्ये गळती लागली. लागलेल्या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. ही गळती लागल्याची माहिती मिळताच पाणी पुरवठा सभापती सुहास राजेशिर्के यांनी पाणी पुरवठा विभागाचे अभियंता दिग्विजय गावडे यांना सुचना दिल्या. सकाळी दहा वाजता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करताच सहा तासात हे काम पूर्ण होवून पंपिंग सुरु केले. मात्र, या कामामुळे शहराच्या काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा दोन दिवस होणार आहे. नागरिकांनी आहे त्या पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. दरम्यान, जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी नगराध्यक्षा माधवी कदम, पाणी पुरवठा सभापती सुहास राजेशिर्के यांनी केली.
सातारा शहराला पाणी पुरवठा करणा-या शहापूर योजनेवर शहरातील केसरकर पेठ, माची पेठ, गुरुवार पेठ, करंजेचा काही भाग, रविवार पेठ, बुधवार पेठ, शनिवार पेठ यासह काही भागांना पाणी पुरवठा केला जातो. या उपसा योजनेला शेंद्रे फिडरद्वारे विद्युत पुरवठा केला जातो. सध्या सुरु असलेल्या भारनियमनामुळे आणि परतीच्या पावसामुळे महावितरणकडून कधीही वीज जाण्याचे प्रकार घडू लागले आहेत. दोनच दिवसापूर्वी तीन तास वीज गेली होती. त्यामुळे पंपींग झाले नाही. पाण्याचा उपसा झाला नव्हता. पाणी पुरवठा पुन्हा सुरळीत झाला होता. परंतु रविवारी रात्री शहापूर उपसा योजनेचा विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे मोटर काही काळ बंद होवून पुन्हा विद्युत पुरवठा आल्याने सुरु झाली. उपसा बंद च्या काळात जकातवाडी येथील फिल्टरेशन टँकमधून जलवाहिनीतून पाणी पुन्हा उपसा केंद्राकडे गेल्याने जकातवाडी परिसरातच तालुका क्रीडा संकुलाच्या पाठीमागे असणाऱया शेतात जलवाहिनी फुटली. त्यामुळे लाखो लिटर गळती लागली. गळती अशा पद्धतीने लागली होती. की जमीनीतून उमाळे फुटल्याचे नागरिकांनी पाहून पालिकेला याची माहिती दिली. सभापती सुहास राजेशिर्के यांना ही घटना समजताच त्यांनी तातडीने दुरुस्तीच्या सुचना दिल्या गेल्या. पाणी पुरवठा विभागाचे अभियंता दिग्विजय गाढवे यांनीही लगेच गळतीच्या ठिकाणी पोहचून जेसीबी व कर्मचा-यांच्या सहाय्याने गळती काढण्याचे काम हाती घेतले. शहापूरचे पंपिंग बंद ठेवून दुरुस्तीचे काम करण्यात आले. सहा तास दुरुस्ती केली. जलवाहिनीला मोकळी करुन लोखंडी पॅच लावून तो पॅच शिसे भरुन वेल्डींग केला. या कामाची पाहणी नगराध्यक्षा माधवी कदम, पाणी पुरवठा सभापती सुहास राजेशिर्के, नगरसेवक यशोधन नारकर, ज्ञानेश्वर फरांदे यांनी करुन काम तातडिने करा, अशा सुचना दिल्या. हे काम केल्यामुळे सायंकाळी उशीरा जलवाहिनी दुरुस्त झाल्याने पंपिंगही सुरु करण्यात आले. परंतु सहा तासाच्या गॅपमुळे शहराच्या काही भागात अपू-या दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर काटसकरीने करावा, असे आवाहन पालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.