चारभिंतीवर दरड कोसळली, नागरिकांच्या प्रसंगवधानाने अनर्थ टळला

सातारा, दि. 9 (प्रतिनिधी)- सातारा शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे नगरपालिकेपासून चारभिंतीकडे जाणा-या रस्त्यावर दरड कोसळली. सकाळी फिरायला जाणा-या नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी एका तासात रस्त्यावरुन दरडीचा भाग बाजूला केला. नागरिकांच्या प्रसंगवधानामुळे अनर्थ टळला असून परिसरातील नागरिकांनी त्याला धन्यवाद दिले.

याबाबत अधिक माहिती अशी चारभिंत आणि अंजिक्यतारा किल्लायसाठी नगरपालिका कार्यालयासमोरुन एक रस्ता जातो. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे चारभिंती समोरील डोंगरावरील दरड कोसळून रस्त्यावर आली. या रस्त्याच्या खालच्या बाजूला नागरी वस्ती आहे. तथापि दरड कोसळल्यानंतर त्याचे भाग होऊन ते रस्त्यावरच पडले त्यामुळे पुढील अनर्थ टळला. सकाळी या रस्त्यावरुन शाळेत सोडायला जाणा-यांची तसेच फिरायला येणा-यांची वाहतूक असते. दरड कोसळल्याचे लक्षात येताच श्रीकांत ढाणे, पोलिस कर्मचारी आवळे आणि जिल्हा विशेष शाखेचे घाटगे यांनी तातडीने रस्त्यावरील दरड हटवण्यास सुरुवात केली. एक तासाच्या परिश्रमानंतर दरड हटवण्यात त्यांना यश आले. दरडीचा भाग रस्त्यावर असल्याने अपघात होण्याची शक्यता होती परंतु नागरिकांनी प्रसंगावधान राखत दरड हटवल्याने पुढील अनर्थ टळला. परिसरातील नागिरकांनी या तिघांचे कौतुक करत त्यांना धन्यवाद दिले.