तालुका खरेदी- विक्री संघामुळे शेतक-यांचे जीवनमान उंचावले – आमदार शिवेंद्रसिंहराजे

संघाची 72 वी वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न

सातारा, दि. 9 –  सातारा तालुका खरेदी-विक्री संघाने काटकसरीचा आणि नियोजनबध्द कारभार करुन संस्था प्रगतीपथावर नेली आहे. संस्था सभासद आणि शेतक-यांना खते, बि- बियाणे, किटकनाशके, तणनाशके, औषधे आदीचा वेळेत पुरवठा केला असून शेतकरी हित जोपासले. यामुळेच शेतक-यांचे जीवनमान उंचावले असून संघाबद्दल शेतकरी, सभासदांचा विश्‍वास दृढ झाला आहे, असे गौरवोद्गार आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले.

सातारा तालुका खरेदी-विक्री संघाची 72 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. अध्यक्षस्थानी संघाचे चेअरमन गणपतराव शिंदे होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती सौ. वनिता गोरे, माजी सभापती सतीश चव्हाण, सदस्य प्रतिक कदम, माजी सदस्य राजू भोसले, पंचायत समितीचे सभापती मिलींद कदम, उपसभापती जितेंद्र सावंत, बाजार समितीचे सभापती अॅड. विक्रम पवार आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

अहवाल सालात संस्थेची 24 कोटी 89 लाखाची उलाढाल झाली असून संस्थेला 32 लाख 79 हजार रुपये नफा झाला आहे. सभासद व शेतकर्‍यांना संघाच्या 11 शाखांमार्फत खते, बि- बियाणे, किटकनाशके, तणनाशके, औषधे पुरवली जातात. इफको कंपनीची औषधे विक्रीमध्ये संस्थेने महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे तसेच खते विक्रीत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.  शेतक-यांच्या सोयीसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी सातारा शहरात संस्थेच्या जागेत इफकोच्या सहकार्याने इफको कंपनीची सर्व उत्पादने रास्त व कंपनीच्या योग्य दरात उपलब्ध करुन देण्यासाठी इफको ई बझार सुरु करण्याचा मान तालुका संघाला मिळणार आहे. इफको कंपनीमार्फत संघाने शेतक-यांसाठी संकटहरण विमा योजना, किसान सुरक्षा विमा योजना राबवली असून या योजनेचा 2016-17 या वर्षात 50 शेतक-यांना लाभ झालेला आहे. संघाने विश्वासाहर्ता जपत प्रगतीचा आलेख चढता ठेवला असून संघामार्फत शेतकरी, सभासदांचे हित जोपासावे, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी संचालक मंडळाला केले.

जेष्ठ संचालक सुरेंद्र देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. संचालक सुनिल काटे यांनी स्वागत केले. व्यवस्थापक भरत चव्हाण यांनी सभेपुढील विषय वाचन केले. संचालक नारायण साळुंखे यांनी आभार मानले. कार्यक्रमास जिल्हा खरेदी विक्री संघाचे चेअरमन अॅड. सुर्यकांत धनवडे, पंचायत समितीचे सदस्य राहूल शिंदे, दयानंद उघडे, माजी सभापती धर्मराज घोरपडे, अजिंक्यतारा कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत, व्हा. चेअरमन विश्‍वास शेडगे, बाळकृष्ण फडतरे, नितीन पाटील, इंद्रजीत नलवडे, रमेश चव्हाण, महादेव धोत्रे, दिलीप निंबाळकर, सुरेश कदम, अरविंद चव्हाण, शिवराम घोरपडे, भानुदास चवरे यांच्यासह तालुका संघाचे सर्व संचालक, सभासद, सेवक व विकास सेवा सोसायट्यांचे चेअरमन, संचालक, विविध ग‘ामपंचायतीचे सरपंच, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.