मुख्यमंत्र्यांच्या व्हिडिओ कॉन्फरसिंगमुळे खरीप हंगाम पूर्व तयारीची बैठक गुंडाळली

सातारा, दि.13 (प्रतिनिधी)– जिल्हयातील शेतक-यांच्या दृष्टीने महत्वाची असणारी खरीप हंगाम पूर्व तयारीची बैठक गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झाली. मुळातच ही बैठक अर्धा तास उशीरा सुरु झाली. त्यानंतर बैठकीत विविध आमदारांनी कृषी विभागाच्या कारभारावर प्रश्न विचारत असतानाच मुख्यमंत्र्यांच्या व्हिडिओ कॉन्फरसिंगचा निरोप आल्याने पालकमंत्री आणि सहपालकमंत्र्यांनी ही बैठक अक्षरशः गुंडाळली. त्याला जिल्हा नियोजन बैठकीत आक्रमक असणा-या आमदारांची मूक संमती मिळाली. त्यामुळे जिल्हा कृषी अधीक्षक जितेंद्र शिंदे यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. दरम्यान शेतकऱ्यांना पेरणीसाठी देण्यात येणाऱ्या बी-बियाणांच्या वाणाचा दर्जा उत्तम राखण्यात यावा. यासाठी कृषी विभागाच्या भरारी पथकाने तक्रारीची वाट न पाहता  छापे टाकावेत. निकृष्ट दर्जाचे बियाणे, खते तसेच किटक नाशक विक्रेत्यांवर कारवाई करा, असे आदेश पालकमंत्री विजय शिवतरे यांनी बैठकीत दिले. तर प्रलंबित असलेल्या कृषी पंपाच्या कनेक्शनबाबत अर्थमंत्री, ऊर्जामंत्री आणि जिल्हयातील लोकप्रतिनिधींची स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्वासन सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात आयोजित खरीप हंगाम 2017 च्या पूर्वतयारी आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री. शिवतारे बोलत होते.  या बैठकीस सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर खा. विजयसिंह मोहिते पाटील, सर्वश्री आमदार मोहनराव कदम, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, शंभूराज देसाई, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, दीपक चव्हाण, शशिकांत शिंदे, जिल्हाधिकारी अश्विन मुद्‌गल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, कृषी सहसंचालक डॉ. नारायण शिसोदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी चांगदेव बागल आदी यावेळी उपस्थित होते.

तब्बल सहा महिन्याच्या कालावधीनंतर आलेल्या पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत खरीप पूर्व हंगामाची बैठक तब्बल अर्धा तास उशीरा सुरु झाली. सुरुवातीची दहा मिनिटे स्वागत आणि प्रास्ताविकात गेली. त्यानंतर जिल्हा कृषी अधीक्षक जितेंद्र शिंदे यांनी सादरीकरणास सुरुवात केली. त्यात त्यांनी जिल्हाधिका-यांनी प्रास्तविकात सांगितलेलीच माहिती पुन्हा दाखवली. आकडेवारी आणि माहितीचे सादरीकरण सुरु असताना आमदार बाळासाहेब पाटील यांनी यावेळेस तरी भाताचे बियाण वेळेत उपलब्ध होणार का असा प्रश्न विचारत जितेंद्र शिंदेंना गुगली टाकली. त्याला कसेबसे उत्तर देत 15 मे पर्यंत सर्व बियाणे उपलब्ध होईल असे सांगितले. निकृष्ट बियाणे आणि खताच्या तक्रारी दरवर्षी हजारो प्रमाणात येत असतात परंतु सरकारी पातळीवर कारवाईच्या संख्या मात्र दोन अंकी आकडयात असते. सादरीकरणातील ही बाब पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी पालकमंत्री आणि सहपालकमंत्र्यांच्या निर्दशनास आणू देताच कृषी अधीक्षक जितेंद्र शिंदे तीच आकडेवारी पुन्हा सांगू लागले. अखेर पालकमंत्री शिवतारे यांनी त्यांची बाजू सावरत म्हणाले, शेतकरी ज्या कृषी सेवा केंद्रातून बियाणे खरेदी करतात त्या प्रत्येक कृषी सेवा केंद्रात तक्रार रजिस्टर ठेवण्याचे बंधनकारक करा.  शेतकऱ्यांसाठी बियाणांबाबत तक्रार करण्यासाठी एक संपर्क क्रमांक बियाणे विक्रेत्याने प्रदर्शित करावा.  कृषी विभागाने येणाऱ्या तक्रारींचा आढावा घेऊन या तक्रारी गुण नियंत्रण कक्षाकडे पाठवाव्यात म्हणजेच बोगस बियाणांवर आळा बसेल. कृषी पंपांच्या जोडणीबाबत वित्तमंत्र्यांच्याबरोबर येत्या काही दिवसात सर्व आमदारांची स्वतंत्र बैठक घेऊन हाही प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असेही त्यांनी शेवटी सांगितले.

मार्च 2013 नंतर जिल्हयात कृषीपंपाचे कनेक्शन देण्यात आलेले नाहीत याबाबत आमदार मकरंद पाटील यांनी प्रश्न विचारताच पालकमंत्री शिवतारे यांनी पश्चिम महाराष्ट्रात मागणी जास्त आहे परंतु विदर्भ, मराठवाडयातील अनुशेष भरुन निघाले नसल्याचे कारण जात आहे त्यावर आमदार मकरंद पाटील यांनी तुम्ही पालकमंत्री आहात तुम्ही पाठपुरावा केला पाहिजे. ऊर्जामंत्र्यांकडे कैफियत मांडली पाहिजे असे सांगितले त्यावर पालकमंत्र्यांनी जुनाच राग आळवत विधानसभेतील विषय येथे नको येथे बोलून उपयोग होणार नाही तुम्ही विधानसभेत का बोलत नाही असे सांगताच आमदार मंकरद पाटील म्हणाले आता तुमच्या जोडीला सहपालकमंत्री सदाभाऊ खोत आहेत तुमच्या दोघांचे वजन आहे तुम्ही मांडले तर हा प्रश्न सुटु शकतो. त्यावर सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी मी स्वतः ऊर्जामंत्र्यांशी बोललो आहे. अर्थमंत्र्यांबरोबर सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्हयाची बैठक घेऊ असे सांगितले त्यावर आमदारांनी सातारा जिल्हयाची स्वतंत्र बैठक घ्या असे सांगितले. तर शिवतारे यांनी मी पाठपुरावा करत आहे. पुरवणी अंदाजपत्रकात तरतूद होईल असे सांगितले. आमदार शंभूराज देसाई यांनी शेजारी बसलेल्या आमदार दीपक चव्हाण यांना लक्षवेधी टाकण्याची सूचना केली असता आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी तुम्हीच टाका अशी गुगली आमदार देसाई यांना टाकली. बैठकीत विविध विषयावर चर्चा सुरु असतानाच मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ कॉन्फरसिंगचा निरोप आल्याने बैठक अक्षरशः गुंडाळण्यात आली.

प्रास्ताविकात जिल्हाधिकारी श्री. मुद्‌गल म्हणाले, कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या उन्नत शेती-समृद्ध शेतकरी हे अभियान जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत शेतकऱ्यांनी बियाणे व खते  कोणती घेतली पाहिजे याची माहिती देवून  पीक प्रात्यक्षिकेही दिली जाणार आहेत, त्याचा भविष्यात शेतकऱ्यांना फायदा होईल. शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या   ज्या योजना आहेत  त्या योजना या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे.

जिल्ह्याचे 8 लाख हेक्टर क्षेत्र लागवडी युक्त आहे. यामध्ये 63 टक्के खरीप व 36 टक्के रब्बीचे आहे. गेल्या तीन चार वर्षांपासून जिल्ह्यात खरीपाचे क्षेत्र वाढत आहे. मागणीनुसार खतांचा व बियाणांचा पुरवठा जिल्ह्याला होणार आहे. खतांच्या व बियाणांच्या तपासणीसाठी भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. कुणी दोषी आढळल्यास या पथकाकडून कारवाई केली जाणार आहे. कृषी विभागामार्फत 8 लाख शेकऱ्यांच्या शेतीचे माती परीक्षण करण्यात आले असून या परीक्षणासाठी 10 प्रयोग शाळा उपलब्ध आहे. जिल्ह्यातील 9 तालुके ही खरीपाची आहे. खरीप हंगामासाठी बी-बियाणे व खते कमी पडणार नाहीत याचे नियोजन करण्यात आले आहे. मुग, उडीद, सोयाबीन पिकांसाठी स्वत:कडील बीयाणे वापरण्याबाबत कृषी विभागामार्फत आवाहन करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चातही बचत होणार आहे. खरीप हंगाम 2017 साठी 1 लाख 28 हजार  मे. टन खताची  तर 53 हजार 867 किलो बियाणांची मागणी केली असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.

या बैठकीस जिल्हा उपनिबंधक डॉ. महेश कदम, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक महादेव शिरोळकर, जिल्हा नियोजन अधिकारी बी.जे. जगदाळे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, जिल्हा परिषदेच्या विशेष समित्यांचे सभापती, पंचायत समितींचे सभापती, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कर्जमाफी करा विषय संपेल – आमदार मकरंद पाटील

खरीप हंगाम पूर्वतयारी बैठकीत कृषी पतपुरवठयाची माहिती अधिकारी देत असतानाच आमदार मकरंद पाटील यांनी शासनाने कर्जाची आकडेवारी मागितली आहे की अशी विचारणा केली. तर जिल्हयात खरीपाचे क्षेत्र घटत असून रब्बीचे क्षेत्र वाढत आहे यावर बोलताना तूरीचे क्षेत्र वाढले परंतु त्याला भाव आहे का अशी विचारणा सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे बघून केली असता मंत्री खोत म्हणाले, तुरीला भाव आहे आणि जोपर्यंत सर्व तूर खरेदी होत नाही तोपर्यंत केंद्र सुरु ठेवण्याचा निर्णय विधानसभेत झाला आहे. परंतु तुम्ही या अधिवेशनात सभागृहात आलाच नाही असे म्हणताच आमदर मकंरद पाटील म्हणाले, तुम्हीचा आम्हाला पाय-यावर बसवले तेवढी कर्जमाफी करुन टाका म्हणजेच विषय संपेल.