मराठी सक्षमतेसाठी अभ्यासपूर्ण लेखन आणि वाचन गरजेचे – लेखिका वीणा गवाणकर

सातारा, दि. 18 (प्रतिनिधी)- मराठीत मोठया प्रमाणात प्रतिशब्द आहेत. आतापर्यंत माझ्या लिखाणात एक-दोन सोडले तर ज्यांच्यावर मी लिहिले त्यातील बहुतेक माहिती मला इंग्रजीत मिळाली आहे तरीसुध्दा माझ्या लिखाणात इंग्रजाळलेपणा कुठेही दिसणार नाही. मराठी भाषा सक्षम होण्यासाठी अभ्यासपूर्ण लेखन गरजेचे आहे. मराठीमध्ये विपुल साहित्य उपलब्ध असून त्याचे वाचन गरजेचे आहे असे मत ज्येष्ठ लेखिका वीणा गवाणकर यांनी व्यक्त केले.

मसाप, शाहुपुरी शाखेच्या मराठी वाडमय मंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये आयोजित माझा लेखन प्रवास या विषयावर त्या बोलत होत्या. व्यासपीठावर मसाप सातारा जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ, विनोद कुलकर्णी, ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ उपस्थित होते.

लेखन प्रवासाबद्दल बोलताना गवाणकर म्हणाल्या, मी काही सिद्धहस्त, प्रतिभासंपन्न लेखक वगैरे नाही. अत्यंत प्रयत्नपूर्वक संदर्भ-साहित्य जमवून ते काळजीपूर्वक तपासून आणि तितक्याच कष्टपूर्वक त्यांची मांडणी करून एखाद्या चरित्रनायक/ नायिकेची ओळख करून देण्यासाठी माझी धडपड असते. ‘ओळख’ अशासाठी की, माझी पदवी मराठी वाङ्मयाची, मात्र आजवर मी लिहीत आले ते बहुतेक सर्व विषय या ना त्या प्रकारे विज्ञानाशी निगडित. त्यामुळे चरित्रविषय हाताळताना संबंधित शास्त्राची माहिती मला करून घ्यावी लागते. माझ्या आकलनाच्या कक्षेत तो विषय आल्याखेरीज मी लिहीत नाही. अर्थात ते आकलन त्या व्यक्तीचं त्या क्षेत्रातलं कार्य समजण्यापुरतं मर्यादित असतं. माझी समजूत वाढवण्याच्या या माझ्या प्रवासात मी कात्रणं – संदर्भग्रंथ – ध्वनिफिती – चित्रफिती – ग्रंथालयीन संशोधन – मुलाखती यातच गुंतलेली असते. त्या काळात माझ्या ज्ञानात आणि अनुभवांत, दोन्हीत भर पडत असते. खरं तर पुस्तकांनी दिलेल्या यशाइतकंच या अनुभवांनीही मला समृद्ध केले आहे.

लिहिण्यासाठी मला विषय शोधावा लागत नाही. तो कधी माझ्या वाचनातून समोर येतो, तर कधी एखादा वाचक आव्हान म्हणून समोर ठेवतो. नागपूरच्या प्रा. किशोर महाबळांनी डिसेंबर १९९२ मध्ये ‘काव्‍‌र्हर लेखक- वाचक’ मेळावा घेतला. चारशे-पाचशे श्रोते होते. त्यातले बहुतेक कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी होते. प्रश्नोत्तराच्या वेळी एका विद्यार्थ्यांनं विचारलं, ‘‘तुम्हाला काव्‍‌र्हर, स्कडर अशा विदेशी व्यक्तींवरच लिहायला आवडतं का? कोणी भारतीय तसा सापडला नाही का?’’ मी म्हणाले, ‘‘तसं काही नाही. झटपट प्रसिद्धी मिळवू पाहाणाऱ्या व्यक्तीपेक्षा चार-पाच दशकं एखादं कार्य नेटानं पार पाडणाऱ्या व्यक्तीविषयी मला कुतूहल वाटतं. मी त्याचा शोध घेते. प्रत्येक वेळी त्यावर लिहितेच असं नाही. नागपुरात डॉ. खानखोजे नावाचे थोर क्रांतिकारक, कृषितज्ज्ञ होऊन गेलेत.. त्यांचा शोध तुम्ही कोणी तरी घ्या. त्यांच्यावर लिहा..’’ आणि नंतर पुढची चार वर्ष मीच त्यांचा शोध घेतला. आणि ‘डॉ. खानखोजे नाही चिरा..’ चरित्र लिहिलं. हे चरित्र लिहितांना आलेले विविध अनुभवही त्यांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे सालीम अली, ‘डॉ. आयडा स्कडर’, रॉबी डिसील्वा यांचे चरित्र लिखाण करताना आलेले अनुभव, ते लिहिण्यासाठी केलेला अभ्यास याविषयी सांगितले.

प्रारंभी मसाप, शाहुपुरी शाखेच्यावतीने त्यांचा विनोद कुलकर्णी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी रवींद्र बेडकिहाळ यांना विश्वकर्मा मुक्त विद्यापीठ दिल्ली यांच्यातर्फे डॉ. बाळशास्त्री जांभेकर यांच्याविषयी केलेल्या कार्याबद्दल डॉक्टरेट देण्यात आली त्याबद्दल सातारकरांच्यावतीने त्यांचे अभिनंदन करुन वीणा गवाणकर यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी बोलताना रवींद्र बेडकिहाळ म्हणाले, मसापने मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी लढा सुरु केला असून त्यात मसाप, शाहुपुरी शाखेचे बहुमूल्य योगदान आहे. विनोद कुलकर्णी यांनी पंतप्रधान कार्यालयाशी केलेल्या पत्रव्यवहारामुळे मराठीला अभिजात दर्जा मिळण्यातील अडचणी दूर झाल्याचे समोर आले असून दर्जा देण्यासाठी सुधारित प्रक्रिया सुरु झाली आहे त्यामुळे लवकरच मराठीला अभिजात दर्जा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रास्ताविक विनोद कुलकर्णी यांनी केले. लेखिकेची ओळख मसाप शाहुपुरी शाखेचे कार्यवाह डॉ. उमेश करंबळेकर यांनी करुन दिली. अमर बेंद्रे यांनी सूत्रसंचालन करुन आभार मानले. कार्यक्रमास डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर, प्रा. संध्या चौगुले, साहित्यप्रेमी आणि वाचक मोठया संख्येने उपस्थित होते.