एक हजार गावांना बीमा ग्राम करण्याचे सातारा विभागाचे उद्दिष्ट

सातारा, दि. 2 (प्रतिनिधी)- सातारा विभागाने या आर्थिक वर्षात आतापर्यंत 65 हजार पॉलीसीसह 148 कोटी प्रिमीयम करुन 31 टक्के वाढ केली आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून सातारा विभागाने यावर्षी 1000 गावांना बीमा ग्राम बनविण्याचे उद्दिष्ठ ठेवल्याची माहिती श्री.गडपायले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

एल.आय.सी.च्या गेल्या 9 महिन्यातील कामगिरीचा आढावा घेताना श्री.गडपायले म्हणाले, गेल्या आर्थिक वर्षात एल.आय.सी.ने देशभरात 2 कोटी 16 लाख दाव्यांची 1 लाख 1 हजार कोटींची रक्कम आपल्या पॉलीसी धारकांना अदा केली. देशभरात आणि विदेशातही कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवत 4689 विविध कार्यालयांव्दारे 29 कोटी ग्राहकांना सेवा देत आहोत. राष्ट्र उभारणी आणि राष्ट्र विकासाच्या कार्यात एल.आय.सी. नेहमीच अग्रेसर राहून विविध सरकारी-निमसरकारी आणि सामाजिक क्षेत्रात एल.आय.सी. ने 1 लाख 49 हजार कोटी रक्कम गतवर्षात गुंतवली आहे. एल.आय.सी. आपल्या विमा योजना, समूह योजना, सरकारी सामाजिक सुरक्षा योजना, पेन्शन योजना यशस्वीरित्या राबवून सामाजिक बांधिलकी जपत असते. एवढेच नव्हे तर एल.आय.सी. ने गोल्डन ज्युबिली फाऊंडेशन ट्रस्ट या संस्थेमार्फत शिक्षण, आरोग्य, आदिवासी विकास, शाळा रुग्णालयांच्या इमारती, ग्रंथालय, संगणक, विद्याथर्यासाठी शिष्यवृत्ती इत्यादी विविध 356 प्रकल्पाव्दारे 77.19 कोटी रक्कम खर्च केली आहे.

सातारा विभागाने या आर्थिक वर्षात आतापर्यंत 65 हजार पॉलीसीसह 148 कोटी प्रथम प्रिमियम करुन प्रिमियमध्ये 31 टक्के वाढ दर्शवली आहे. यावर्षी एल.आय.सी. डायमंड ज्युबिली वर्ष साजरे करत आहे यानिमित्ताने बिमा डायमंड नावाची पॉलिसी सादर करण्यात आली आहे. जीवन लाभ सारखी पॉलीसी सर्वांनाच लाभदायक आहे. घटत्या व्याजदराच्या काळामध्ये जीवनअक्षय सारखी योजना आजही 6.90 टक्के निश्चित दराने परतावा देते. या डायमंड ज्युबिली वर्षामध्ये एल.आय.सी. ने आपल्या सर्व विमाधारकांना विशेष बोनस जाहीर केला आहे.

सामाजिक बांधिलकी म्हणून सातारा विभागाने यावर्षी एक हजार गावांना बीमा ग्राम बनविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ज्यामध्ये या गावांना एक लाख रुपये पर्यंतची रक्कम गावाच्या विकासासाठी त्यात स्त्रिया व मुलांसाठी स्वच्छतागृह, हातपंप, सोलर लाईट, पाण्याची टाकी किंवा शाळा ग्रामपंचायतीसाठी खोली, स्वच्छतागृह यासाठी प्रदान करण्यात येते. यासाठी सातारा आणि सांगली जिल्हयातील 1325 गावच्या सरपंचांना पत्र लिहून शाखाधिकारी, अभिकर्ते, विकास अधिकारी यांनी याकामी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणत्याही गावामधून कमीत कमी 100 पॉलीसी आणि 10 लाख प्रिमियम केला की ते बीमा ग्राम पुरस्कारासाठी पात्र होते व त्या गावाला गावाच्या विकास कामासाठी एक लाख रुपयांचा निधी एल.आय.सी. कडून देण्यात येतो असेही त्यांनी सांगितले.