जनजागृती चित्ररथाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

सातारा, दि. 9 – 13 ऑक्टोबर हा दिन संपूर्ण देशात जागतिक आपत्ती धोका निवारण दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त जिल्ह्यामध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सप्ताह साजरा करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या  चित्ररथाचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी साहेबराव गायकवाड, तहसीलदार सोनिया घुगे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे यांच्यासह जिल्हाधिकारी  कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

या चित्ररथाद्वारे प्रामुख्याने भूकंप, आग, रस्ते अपघात, स्वाईन फ्लू, वीज पडून होणारे अपघात, दरड कोसळणे इत्यादी आपत्तीचे निवारण सचित्रांद्वारे फ्लेक्स, ऑडिओद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे.  तसेच आपत्ती दरम्यान काय करावे व काय करु नये याबाबती माहिती देण्यात येणार आहे. हा चित्ररथ दि.9 ते 19 ऑक्टोबर 2017 या कालावधीत प्रत्येक तालुक्यामध्ये एक दिवस याप्रमाणे फिरणार आहे. हा चित्ररथ सर्व शासकीय कार्यालये, एस.टी. बसस्थानके, संपूर्ण शहरी व ग्रामीण भाग, शाळा, महाविद्यालये आणि आपत्ती प्रवण असणाऱ्या गावांमध्ये जाऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे. या चित्ररथाला जिल्हाधिकारी श्रीमती सिंघल यांनी झेंडा दाखवून मार्गस्थ केले.