शिक्षणासंबंधी आंदोलनांनी गाजला शनिवार

शिक्षकांचे निवेदन, अंगणवाडी सेविकांची निदर्शने व शालेय पोषण आहार कर्मचार्‍यांची धरणे

सातारा, दि. 18 (प्रतिनिधी) – शिक्षकांची बदली प्रक्रियेच्या समर्थनार्थ बदली हवी शिक्षक वर्गाच्यावतीने जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निवेदन देवून बदली प्रक्रिया त्वरीत राबवून कार्यमुक्त करावे, अशी मागणी केली. अंगणवाडी सेविकांनी परभणीतील अंगणवाडी सेविका सुमित्रा राखुंडे यांनी आत्महत्या नसून त्यांचा प्रशासनाने केलेला खून आहे. त्याची संपूर्ण जबाबदारी म्हणून मुख्यमंत्री, अर्थमंत्री व महिला व बालकल्याणमंत्री आणि अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करा, या मागणीसाठी निदर्शने केली. तर शालेय पोषण आहार कर्मचा-यांनी विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले.

बदली हवी शिक्षक वर्गाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी 27 फेब्रुवारी 2017 च्या शासन निर्णयान्वये बदली प्रक्रिया सुरु केली असून ती अंतिम टप्प्यात आहे. न्यायालयाने देखील याबाबत सकारात्मक निर्णय दिलला आहे.  ऑनलाईन बदली प्रक्रिया स्वच्छ आहे. कोणताही वशिला चालणार नाही, सर्वांची सोय होणार आहे. यामध्ये संवर्ग 1 मध्ये अपंग, परितक्त्या, विधवा, कुमारिका व 53 वर्षाच्या पुढील शिक्षक आहेत. संवर्ग 2 मध्ये 30 किमीच्या बाहेर असणारे पती-पत्नी शिक्षक आहेत. संवर्ग 3 मध्ये दुर्गम भागात काम करणारे शिक्षक आहेत. त्यांचीही सोय होणार आहे. जरी संवर्ग 4 मधील काही शिक्षकांची गैरसोय झालीच तर ती फक्त 3 वर्षांसाठीच होणार आहे. ते पुन्हा अर्ज करुन घराजवळची शाळा मागू शकतात. शिक्षकांना विनंती बदली देखील हवी आहे. उच्च न्यायालयाने देखील बदल्या करा, असा निकाल दिला आहे. सरकारने देखील 98 टक्के बदलीचे काम पूर्ण केले आहे. फक्त आदेश देवून सोडणे बाकी आहे. पण काही तथाकथीत संघटना विरोध करत आहे. आता बदली इच्छुक शिक्षकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून उपोषणाचा इशारा दिला असून पुर्वीच्या जीआरने संघटनेच्या लोकांना सूट होती पण आता नवीन जीआरने ती सूट बंद केली आहे. तरी त्वरीत या बदल्या करुन आम्हाला कार्यमुक्त करावे, अशी मागणी केली आहे. अन्यथा 20  व 21 नोव्हेंबरला दोन दिवस साखळी उपोषण करण्यात येईल, अशी मागणी केली आहे.

सातारा जिल्हा पूर्व प्राथमिक शिक्षिका सेविका संघाच्या अंगणवाडी सेविकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या तीन चार वर्षांपासून वेळेत मानधन नाही. टीएडीए नाही, आहाराची बिली दिली नाहीत, मानधन नाही या तणावाखाली काम करत असताना बोर्डी, जि.परभणी येथील सुमित्रा राखुंडे यांनी आत्महत्या केली. त्याची संपूर्ण जबाबदारी मुख्यमंत्री, अर्थमंत्री व महिला व बालकल्याणमंत्री, मंत्रालयीन सचिव, परभणीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेवून त्यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा. सातारा जिल्ह्यातील सेविका बचत गटाच्या नावाखाली आहार शिजवतात व इतर खर्च करण्यासाठी मानधनावर कर्ज काढावे लागत आहे. त्याचे व्याज व हप्ते भरुन महिला त्रस्त झाल्या आहेत. म्हणून मागणी की, महिलांनी भरलेली कर्जे माफ करावी. तसेच सेविकांना मतदान केंद्र स्थळ अधिकारी नेमणूक केली जाते. त्यांना मोबाईल फोन द्यावे, तसेच प्रतिदीन 300 रुपये मानधन देण्यात यावी, मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्यावतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शालेय पोषण आहार कर्मचार्‍यांचे मानधन दर महिन्याला कर्मचार्‍यांच्या खात्यावर जमा करावे, भाजीपाला, पूरक आहार व इंधन बिल स्वयंपाकी कर्मचार्‍यांच्या खात्यावर जमा करणे, गणवेश मिळावा, कर्मचार्‍यांना सफाई व शिपाईची कामे करावे लागते. त्याचेही मानधन मिळावे, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे केली आहे.