सातारा, दि. 4 (प्रतिनिधी) – भरमसाठ व्याज दरामुळे कर्जबाजारी झालेला बळीराजा निराशेत आहे. या निराशेपोटी शेतकर्यांच्या आत्महत्या होत आहे. त्याला यातून बाहेर काढण्यासाठी सकारात्मक पाऊले टाकणे गरजे आहे, असे प्रतिपादन खा. शरद पवार यांनी केले. दरम्यान, रयत शिक्षण संस्थेच्यावतीने आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या मुलांसाठी बोर्डिंग सुरु आले असून सध्या त्यात 40 मुले शिकत आहेत. भविष्यात त्याची व्याप्ती वाढवण्यात येणार असून समाजातूनही सहकार्य मिळत आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या 98 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी आ. पतंगराव कदम होते. व्यासपीठावर खा. विजयसिंह मोहिते-पाटील, आ. दिलीप वळसे-पाटील, रामशेठ ठाकूर, बबनराव पाचपुते, कूपर उद्योग समुहाचे फारुख कूपर, चेअरमन डॉ. अनिल पाटील, व्हा. चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे, निवृत्त प्रशासकिय अधिकारी प्रभाकर देशमुख व मान्यवर उपस्थित होते.
खा. शरद पवार म्हणाले, आघाडी सरकारच्या काळात शेतकर्यांच्या आत्महत्या होत असताना त्यांना तीन लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी देण्यात आली आहे. तसेच नियमित परतफेड करणार्या शेतकर्यांना तीन ते शुन्य टक्के व्याज दराने कर्ज पुरवठा करण्यात आला होता. अशा प्रकारे शेतकर्यांना निराशेतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. आजही अशाच प्रकारचे उपाय करणे गरजेचे आहे. कर्मवीर भाऊराव (अण्णा) पाटील यांच्या विचारांची पताका समर्थपणे पोहचवण्याचे काम करत आहे. त्यांनी घेतलेल्या बहुजन समाजाच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही चालू ठेवली आहे. त्याचबरोबर संस्थेच्या शताब्दीनिमित्त नवीन उपक्रम हाती घेवून त्यांची पूर्तता करण्याचे आमच्यासमोर उदिष्ट आहे. त्यामुळे आगामी काळात जगाची बदलणारी दिशा ओळखून त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना ज्ञान आणि विज्ञानाचे शिक्षण देण्याचे मोठे आव्हान आहे. त्यासाठी संस्थेच्या रिक्त झालेल्या पदामध्ये डॉ. अनिल काकोडकर, डॉ. रघुनाथ माशेलकर यासारखी जगविख्यात मंडळींना संस्थेत आणून त्यांचे संस्थेची नाते जोडले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुजूमदार कुटुंबियांच्या सिम्बॉयसिस या संस्थेसोबत करार करुन कौशल्य विकासचे अभ्यासक्रम रयत संस्थेत सुरु करण्यात येणार आहे. त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा आत्मविश्वास मिळणार आहे. आगामी काळात समाजातील उपेक्षित मुले शिकवून त्यांच्या पाया उभी राहिल्याशिवाय राहणार नाही.
अध्यक्षीय भाषणात डॉ. पंतगराव कदम म्हणाले, राज्याच्या शैक्षणिक दर्जा खालावत चालला आहे. त्यामुळे राज्यातील 50 टक्के इंजिनिअरिंग, 80 टक्के पॉलिटेक्निक व मेडिकल कॉलेज बंद होण्याच्या मार्गावर आहे. ज्यांना शिक्षण क्षेत्रातील माहिती नाही अशी लोक राज्य करत असल्याने या समस्या निर्माण झाल्या आहेत. यासाठी शरद पवार यांनी परिवर्तनाची मशाल हाती घेवून संपूर्ण देशाला दिशा देण्याचे काम केले पाहिजे, अशी आशा व्यक्त केली.
संस्थेचे सचिव प्राचार्य भाऊसाहेब कराळे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर आदर्श शिक्षक, विद्यार्थी व विशेष पुरस्कारांने गुणवतांचे सत्कार करण्यात आले. यावेळी रयत शिक्षण संस्था व कूपर उद्योग समूह यांच्यामध्ये एक सामंजस्य करार करण्यात आला.यावेळी रयत शिक्षण पत्रिका आणि रयत लाईव्ह अॅपचे उद्घाटन व प्रकाशन करण्यात आले. विशेष पुरस्कार म्हणून ए.के.निकम, डॉ. विजय कुंभार, संजय चौधरी, सौ.संगीता शिंदे, प्रा. संभाजी पाटील व इतरांना देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व उपस्थितांचे आभार सहसचिव विलासराव महाडिक यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. शिवलिंग मेणकुदळे व सागर माने यांनी केले. कार्यक्रमास संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य, लाईफ मेंबर, शाखाप्रमुख, रयत सेवक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.