अंनिसचे 31 डिसेंबरला चला व्यसन बदनाम करुया, मोहिम

सातारा, दि. 21 (प्रतिनिधी) – गेल्या काही वर्षांपासून 31 डिसेंबरला सेलिब्रेशनच्या नावाखाली तरुण पिढीमध्ये मोठ्या प्रमाणात व्यसन वाढताना दिसत आहे. अनेक तरुण या दिवशी व्यसनाचा पहिला अनुभव घेतात आणि पुढे जावून व्यसनाच्या आहारी जातात. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंनिसच्यावतीने चला व्यसन बदनाम करुया ही व्यसन विरोधी मोहिम राबवत आहे. या मोहिमेंतर्गत 15 ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये व्यसनविरोधी सप्ताह राबवणार असल्याची माहिती अंनिसचे सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी दिली.

डॉ. दाभोलकर म्हणाले, सध्या समाजात व्यसनाचे उदातीकरण होताना दिसते. यामुळे तरुण मुले व्यवसानाच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. व्यसनाची प्रतिष्ठा तोडण्याबरोबरच शासनाने समग्र व्यसन विरोधी निती जाहीर करावी, यासाठी या पंधरवड्या दरम्यान पाठपुरावा केला जाणार आहे. दि. 31 डिसेंबरला दारु नको दूध प्या या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन राजवाडा येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये नागरिकांना दारुचे दुष्परिणाम सांगून दारु ऐवजी शरीराला हितकारक दूध पिण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. तसेच परिवर्तन व्यसनमुक्ती संस्थेमध्ये व्यसनमुक्त व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय यांचा स्नेहमेळावा देखील आयोजित करण्यात येणार आहे. ज्या नागरिकांना व्यसनमुक्ती दूत म्हणून काम करायचे असेल त्यांना परिवर्तन व्यसनमुक्ती संस्थेच्या मार्फत मोफत एक दिवसीय प्रशिक्षण दिले जाणार आहे. अशा नागरिकांनी परिवर्तन व्यसनमुक्ती संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.