१६ हजार फूट उंचीवर पुरेसा ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे चिनी सैनिकांची संख्या कमी होऊ लागली

१६ हजार फूट उंचीवर पुरेसा ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे  चिनी सैनिकांची संख्या कमी होऊ लागली

नियंत्रण रेषेजवळ भारतीय हद्दीत घुसखोरी करणारे चिनी सैन्य अजूनही पूर्णपणे मागे फिरलेलं नाही. दीर्घकाळ ही स्थिती अशीच कायम राहिली, तर चिनी सैन्यासमोर भारतीय लष्कराबरोबरच इथल्या वातावरणाचेही मोठे आव्हान असणार आहे. भारतीय आणि चिनी सैन्य सध्या जिथे तैनात आहे, तो पूर्व लडाखमधील उंचावरील युद्धक्षेत्राचा भाग आहे. १५ जूनच्या रात्री भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला. त्यावेळी गलवान नदीचे तापमान जवळपास शून्य होते. काही ठिकाणी ते शून्यापेक्षा खाली होते. त्यावेळी दोन्ही बाजूच्या सैनिकांचा हायपोक्सिया आणि हायपोथेरमियामुळे मृत्यू झाला. हायपोक्सिया म्हणजे उंचावरील क्षेत्रात ऑक्सिजनची कमतरता तर हायपोथेरमिया म्हणजे कडाक्याचा थंडीचा शरीरावर होणार प्रतिकुल परिणाम. या घडामोडींशी संबंधित असलेल्या सूत्रांनी ही माहिती दिली.

सप्टेंबर महिना सुरु झाल्यानंतर पूर्व लडाखमध्ये वातावरणाची भूमिका महत्त्वाची राहिल. “१५ जूनला गलवान खोऱ्यात संघर्ष झाला, त्यावेळी चिनी सैनिक मोठया प्रमाणात वरती आले. पण १६ हजार फूट उंचीवर पुरेसा ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे लगेच त्यांची संख्या कमी होऊ लागली” असे या संघर्षातून बचावलेल्या जवानांनी सांगितले. या संघर्षात शिनजियांग मिलिट्री डिस्ट्रीक्टचे किती सैनिक ठार झाले, ते चीनच्या पीएलएने अद्याप जाहीर केलेले नाही. भारताचे २० जवान या संघर्षात शहीद झाले. चीनच्या बाजूला ठार झालेल्या सैनिकांची संख्या यापेक्षा जास्त आहे असे नाव न छापण्याच्या अटीवर लष्करी कमांडरने सांगितले. इथे तापमानामुळे मृत्यू होत नाही पण वाहणाऱ्या गार वाऱ्यामुळे कडाक्याची थंडी असते. गलवान, गोग्रा, हॉट स्प्रिंगमध्ये वातावरण खूपच खराब असते असे वरिष्ठ लष्करी कमांडरने सांगितले.

हिवाळयात या भागात सात फूट बर्फ असतो, चिनी सैन्याला खूप अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अक्साई चीन, तिबेटमधील चिनी सैन्याला सुरक्षित वातावरणाचा अनुभव आहे. चिनी सैनिक वाहनांमधून गस्त घालतात, तेच भारतीय जवान पायीच गस्त घालतात. त्याशिवाय भारतीय सैन्याला सियाचीन, सिक्कीम आणि तवांगमधील थांग ला रिज येथे प्रतिकुल वातावरणात तैनातीचा अनुभव आहे.