हवेत अचानक झालेल्या गोळीबारामुळे लोणावळा परिसरात खळबळ उडाली

हवेत अचानक झालेल्या गोळीबारामुळे लोणावळा परिसरात खळबळ उडाली

जिल्हाधिकाऱ्यांचे नियम झुगारून आणि पोलिसांची नजर चुकवून काही पर्यटक लोणावळा येथील सहारा ब्रिज येथे मौजमजेसाठी आले होते, त्यातील एकाने हवेत गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली आहे. हवेत अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. या प्रकरणी सागर मोहन भूमकर याच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय, ज्या पिस्तूलातून हवेत गोळीबार करण्यात आला, ते पिस्तुल देखील लोणावळा पोलिसांनी जप्त केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुख्य आरोपी सागर मोहन भूमकर (वय-३५), संदीप हनुमंत जाधव (वय- ३६), सचिन बाळासाहेब भूमकर (वय- ३५), सचिन साहेबराव मांदळे (वय- ३८)अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस कर्मचारी माणिक विलास अहिनवे यांनी लोणावळा पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करोनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळा परिसरात पर्यटनस्थळी पर्यटकांना येण्यास जिल्ह्याधिकारी यांनी मज्जाव केलेला आहे. परंतु, काही पर्यटक शासनाचे नियम झुगारून व पोलिसांची नजर चुकवून भुशी धरण, सहारा ब्रिज येथे मौजमजेसाठी येत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, शनिवारी सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास लोणावळा पोलिसांची नजर चुकवून आरोपी सागर यांच्यासह इतर मित्र सहारा ब्रिजवर मोटारीने गेले होते. तेव्हा तिथे मोटारीत मोठ्या आवाजात गाणे लावून धिंगा मस्ती करत असताना सागरने परवाना धारक पिस्तुलातून हवेत गोळीबार केला.  या प्रकरणी त्याच्यासह इतर मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, हवेत गोळीबार केलेलं पिस्तुल लोणावळा पोलिसांनी जप्त केल आहे. अशी माहिती लोणावळा पोलिसांनी दिली आहे.