शाहरुख लवकरच ‘पठान’ चित्रपटात मुख्य भूमिकेत

शाहरुख लवकरच ‘पठान’ चित्रपटात मुख्य भूमिकेत

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा २०१८मध्ये ‘झीरो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसला होता. पण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. त्यानंतर शाहरुखने कोणताही चित्रपट साइन केला नाही. शाहरुखचा जवळचा मित्र चित्रपट निर्माता, दिग्दर्शक करण जोहरने शाहरुख स्वत:ला वेळ देत आहे असे म्हटले होते. त्यामुळे शाहरुख पुन्हा चित्रपटात कधी दिसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तब्बल दोन वर्षाच्या ब्रेकनंतर शाहरुख पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

यश राज फिल्मला लवकरच ५० वर्षे पूर्ण होणार आहेत. हा आनंद साजरा करणासाठी यश राज फिल्म्स ‘पठान’ हा चित्रपट प्रदर्शित करणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच या चित्रपटात शाहरुख मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. शाहरुखने या चित्रपटासाठी होकार दिला असून पुढच्या महिन्यात या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.