‘श्रावणमासी हर्षमानसी’ नव्या रुपात घेऊन येत आहे स्वप्नील बांदोडकर

‘श्रावणमासी हर्षमानसी’ नव्या रुपात घेऊन येत आहे  स्वप्नील बांदोडकर

त्र्यंबक बापूजी ठोंबरे अर्थात बालकवी यांची ‘श्रावणमासी हर्षमानसी’ ही निसर्ग कविता सगळ्यांनीच लहानपणापासून ऐकली आहे. मात्र आता श्रावण महिना सुरू झाल्याच्या निमित्ताने सागरिका म्युझिकने ही कविता नव्या रुपात, नव्या चालीत सादर केली आहे. गायक स्वप्नील बांदोडकरने नव्या रुपातलं “श्रावणमासी हर्षमानसी” हे गाणे गायलं आहे.

स्वप्नील बांदोडकरचा ‘ती’ हा नवा अल्बम प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे या अल्बममधील ‘कसा चंद्र’ आणि ‘सौरी’ ही गाणी लोकप्रिय ठरत आहेत. त्यातच आता बालकवींची श्रावणमासी ही कविता स्वप्नीलने नव्या अंदाजात सादर केली असून त्यालादेखील, प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे.
संगीतकार निलेश मोहरीर यांचं संगीत लाभलेल्या या गाण्याला कलांगणच्या बालकलाकारांनी कोरस दिला आहे. 

स्वप्नील बांदोडकरचा सागरिका म्युझिकसोबत हा पाचवा अल्बम आहे. यापूर्वी त्याने ‘बेधूंद’, ‘तू माझा किनारा’, ‘तुला पाहिले’ हे हिट अल्बम दिले आहेत. त्यातील ‘राधा ही बावरी’, ‘गालावर खळी’, ‘राधा राधा’, ‘मंद मंद अशी’ गाणी सुपरहिट झाली आहेत. त्याचप्रमाणे ‘श्रावणमासी हर्षमानसी’ हे गाणंही श्रोत्यांच्या पसंतीत उतरल्याचं पाहायला मिळत आहे.