वर्षा उसगावकर दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर

वर्षा उसगावकर दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर

मराठी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या नामवंत ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर तब्बल दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेमध्ये त्या पुन्हा एकदा सासूच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'मड्डम सासू दढ्ढम सून', 'मन उधाण वाऱ्याचे' या मालिकांमधूनही त्यांनी याआधी सासूची भूमिका साकारली आह. यावेळी या मालिकेत त्या कोल्हापूरच्या घरंदाज सासूच्या रुपात दिसणार आहेत.

जवळपास दहा वर्षांपूर्वी 'मन उधाण वाऱ्याचे' या मालिकेत त्यांनी काम केलं होतं. त्यांनतर त्या टीव्ही विश्वापासून लांबच होत्या. यावेळी 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेमध्ये त्या नंदिनी ही व्यक्तिरेखा साकारणार आहेत.

या मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना त्या म्हणाल्या, 'दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा मी छोट्या पडद्यावर येते आहे. यावेळीही ही कोठारे व्हिजन्सचीच मालिका आहे. दहा वर्षांपूर्वीदेखील मी याच निर्मिती संस्थेची मालिका केली होती. मालिकेमुळे आपण घराघरात पोहोचतो. प्रेक्षकांच्या जगण्याचा भाग होतो. त्यामुळेच मालिका करताना मला नेहमीच आनंद होतो. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतली ही भूमिका नक्कीच वेगळी आहे. मी साकारत असलेली नंदिनी ही व्यक्तिरेखा एका गृहोद्योग समूहाची प्रमुख आहे. कोल्हापुरातल्या शिर्के पाटील या नामांकित कुटुंबाचं ती प्रतिनिधीत्व करते. नंदिनी हे पात्र प्रेक्षकांना आवडेल याची खात्री आहे. त्यामुळे मला मालिकेचे भाग प्रक्षेपित होण्याची खूप उत्सुकता आहे.' येत्या १७ ऑगस्टपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.