लोकमान्य टिळक आता असते तर...

लोकमान्य टिळक आता असते तर...

पुणे - 'हातावर पोट आहे अशा लोकांना धान्य देऊन गरज भागणार नाही. त्यांच्या हाताला काम मिळाले पाहिजे. त्यासाठी उद्योग‌ व व्यवसाय क्षेत्र सुरू राहिले पाहिजे. लोकांनी घरात बसून कुटुंबांचे अर्थकारण चालणार नाही. प्लेगच्या साथीवेळी लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश सरकारला ठणकावले; लोकमान्य टिळक आता असते तर त्यांनी या सगळ्या परिस्थितीकडे कसे पाहिले असते, हे सांगता येणार नाही,' अस लोकमान्यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलले.

'प्लेगची साथ हाताळण्यावरून लोकमान्यांनी ब्रिटिश सरकारला ठणकावले होते. लोकमान्य आत्ता असते तर त्यांनी करोनाची साथ, सततचे लॉकडाऊन आणि सरकार व यंत्रणा यांची कार्यपद्धती यावरून काय भूमिका घेतली असती,' असा प्रश्न पत्रकारांनी दीपक टिळक यांना विचारल्यानंतर टिळक म्हणाले, 'प्लेगच्या साथीवेळी लोकमान्यांनी समाजाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. ती साथ हाताळण्यास सरकारला मदत होईल, अशीच भूमिका घेतली, मात्र नंतर सरकारने सैन्यावरील खर्चासाठी पुणेकरांवर कर लागू केला, तसेच साथ हाताळताना दडपशाही सुरू झाल्याने लोकमान्यांनी कठोर भूमिका घेतली. आताही बळजबरी, भीती निर्माण करणे हा मार्ग असू शकत नाही,' अस टिळक यांनी मत केल.

'तेव्हाही जग भारताकडे मोठी बाजारपेठ म्हणून पाहत होते आणि आताही पाहते. देशातील उद्योग-व्यवसाय वाढावे म्हणून लोकमान्यांनी घेतलेली स्वदेशीची भूमिका आजही योग्य असल्याचे चीनने केलेल्या हल्ल्यानंतर अधोरेखित झाले आहे. देशातील रोजगार कमी होत असताना स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार ही लोकमान्यांची चतुःसूत्री आजही तितकीच महत्त्वाची आहे.'