रोहितच्या खेळाची शैली अप्रतिम आहे

रोहितच्या खेळाची शैली अप्रतिम आहे

भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा हा सध्याच्या सर्वोत्तम सलामीवीरांपैकी एक आहे. “रोहितला मैदानावर खेळताना बघायला मला खूप आवडतं. तो एक उत्तर क्रिकेटपटू आहे. त्याच्या खेळाची शैली अप्रतिम आहे. त्याच्या याच शैलीवर काही वेळा मला इर्ष्या वाटते”, असे श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा म्हणाला होता. त्यानंतर आता न्यूझीलंडच्या मध्यमगती गोलंदाजानेही रोहितची स्तुती केली.

न्यूझीलंडचा मध्यमगती गोलंदाज लॉकी फर्ग्युसन याने स्पोर्ट्सकीडाला मुलाखत दिली. त्यावेळी त्याला गोलंदाजी करण्यासाठी अवघड असा फलंदाज कोण? असा प्रश्न विचारला होता. त्यावर फर्ग्युसन म्हणाला, “मला काही फलंदाजांना गोलंदाजी करणं अवघड वाटतं. पण त्यातही रोहित शर्माला गोलंदाजी करणं सर्वात आव्हानात्मक आहे. जर तुम्ही रोहित शर्माला लवकर स्वस्तात बाद केलं नाहीत, तर त्याने मोठी खेळी केलीच समजा. तो अतिशय प्रतिभावंत फलंदाज आहे.”

“स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, विराट कोहली हे फलंदाजदेखील जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहेत. त्यांना गोलंदाजी करणंदेखील कठीण असतं. पण जेव्हा तुम्ही वरच्या फळीतील फलंदाजांना लवकर बाद करता तेव्हा तुम्हाला मधल्या आणि तळाच्या फलंदाजांना गोलंदाजी करण्याची संधी मिळते आणि बळी मिळण्याची शक्यता मिळते”, फर्ग्युसन म्हणाला.