राम मंदिराची प्रातिनिधिक चित्र असणारे आणि रामायणावर आधारित पोस्टाचे तिकीट

राम मंदिराची प्रातिनिधिक चित्र असणारे आणि रामायणावर आधारित पोस्टाचे तिकीट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाच ऑगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. हा भूमिपूजनाचा सोहळा पार पडल्यानंतर त्याच दिवशी पंतप्रधानांच्या हस्ते राम मंदिराची प्रातिनिधिक चित्र असणारे आणि रामायणावर आधारित पोस्टाचे तिकीट प्रकाशित केले जाण्याची शक्यता आहे.

राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याची जोरदार तयारी अयोध्येत सुरु झाली आहे. असं असतानाच या सोहळ्याचे आयोजक असणाऱ्या राम जन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्टने राम भक्तांना पाच ऑगस्ट रोजी अयोध्येत येऊन गर्दी करु नये असं आवाहन केलं आहे. सर्व राम भक्तांना ‘राम जन्मभूमी मंदिर निर्माण यज्ञा’मध्ये सहभागी होण्याची संधी योग्यवेळी दिली जाईल असंही ट्रस्टने स्पष्ट केलं आहे. अयोध्या रिचर्स इन्स्टीट्यूटचे निर्देशक व्हाय. पी. सिंग यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार पोस्टाचे विशेष तिकीट प्रकाशित केलं जाणार आहे.

“सर्व काही ठरवल्याप्रमाणे झालं तर पाच ऑगस्ट रोजीच पोस्टाचे तिकीट प्रकाशित केलं जाईल. यापैकी एक तिकीट हे राम मंदिराची प्रातिनिधिक प्रतिकृती असणारं असेल तर दुसऱ्यावर इतर देशांमध्ये रामाचे महत्व सांगणाऱ्या गोष्टी असतील,” असं सिंग यांनी सांगितलं आहे. अयोध्या रिसर्च इन्स्टीट्यूटच्या माध्यमातून रामलीलेसंदर्भातील काही विशेष पोस्टर आणि कटआऊट्स बनवले जात आहेत. जगभरामध्ये प्रभू रामाचा वेगवगेळ्या संस्कृतींमध्ये असणारा प्रभाव या पोस्टर आणि कटआऊट्समध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहेत. राम मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर हे पोस्टर आणि कटआऊट्स ठेवले जाणार आहेत.