राजू शेट्टी आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यामध्ये चांगलीच जुंपली

राजू शेट्टी आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यामध्ये चांगलीच जुंपली

मुंबई - दूध दरवाढीच्या मुद्यावरून सोमवारी राज्यभरात आंदोलन सुरू आहे. एकीकडे भाजपचे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत या एकेकाळच्या सहका-यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. राजू शेट्टी आता काजू शेट्टी झाला आहे. मंत्रिपद न मिळाल्याने हा भंपक माणूस भ्रमिष्ट झाल्याची जहरी टीका खोत यांनी केली आहे. खोत यांच्या टीकेला शेट्टी यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दूध दरवाढीसाठी केलेल्या आंदोलनात शेतकरीच न दिसल्याने सदाभाऊ खोत भ्रमिष्ट झाल्याचा पलटवार शेट्टी यांनी केला आहे.

राजू शेट्टी भंपक माणूस आहे. हा भंपक माणूस भ्रमिष्ट झाला आहे. प्रत्येक गावात देवाच्या नावाने एक वळू-रेडा सोडलेला असतो. तसा हा रेडा आहे. त्याला शेतक-यांनी सोडून दिले आहे. हा रेडा आता दिसेल त्या पिकात तोंड घालू लागला आहे, अशा शब्दांमध्ये खोत यांनी शेट्टींवर घणाघाती टीका केली. सदाभाऊ खोत दोन वेळा खासदार करायला त्या रेड्याबरोबर होता. तेव्हा दोन्ही हातांनी सदाभाऊचा गजर सुरू होता. तेव्हा सदाभाऊ चालत होता. पण आता त्यांना सत्ता मिळाली नाही, केंद्रात मंत्रिपदही मिळाले नाही. पण त्यांच्या सहका-याला मंत्रिपद मिळाले. त्यामुळे लगेच पोटात गोळा आला, अशा शब्दांत खोत यांनी शरसंधान साधले. आता आंदोलन कशासाठी करता? तुम्हीच सरकारमध्ये आहात. तुम्ही सरकारला पाठिंबा दिला आहे. मग द्या ना शेतक-याला न्याय मिळवून. आंदोलनाची नाटकं कशासाठी करता?, असा सवाल खोत यांनी उपस्थित केला.

खोत यांच्या टीकेला उत्तर देताना राजू शेट्टींनी दूधदरवाढीच्या आंदोलनाचा फज्जा उडाल्याचे म्हटले आहे. भाजपाच्या आंदोलनाचा फज्जा उडाला आहे. त्यांच्या आंदोलनात शेतकरी कुठेच दिसला नाही. त्यामुळे आता सदाभाऊ खोत भ्रमिष्टासारखे आरोप करत आहेत, असा पलटवार शेट्टींनी केला. तुमचे आंदोलन कोणाविरुद्ध आहे? राज्य सरकारविरुद्ध, राजू शेट्टीविरुद्ध की केंद्राविरुद्ध?, असा सवाल शेट्टींनी विचारला.

दूध प्रश्नावर आंदोलन करता. पण दुधाला दर मिळवून देणे राहिले बाजूला. हे राजू शेट्टींवरच टीका करत बसले आहेत. आंदोलनाला अपेक्षित यश न मिळाल्याचे खापर माझ्यावर फोडण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा शब्दांत शेट्टींनी खोत यांना प्रत्युत्तर दिले.