राज्यातील एसटी महामंडळाच्या बसेसची चाकं थांबली

राज्यातील एसटी महामंडळाच्या बसेसची चाकं थांबली

 

कोल्हापूर - करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्याने राज्यातील एसटी महामंडळाच्या बसेसची चाकं थांबली. यामुळे चार महिन्यात महामंडळाला तब्बल अडीच हजार कोटीचा दणका बसला. उत्पन्नाला लागलेल्या ब्रेकमुळे कर्मचाऱ्यांचा जून महिन्याचा पगार अजूनही मिळाला नाही. जिल्हातंर्गत बसवाहतूक सुरू झाली असली तरी त्यातून डिझेलचा खर्चही निघत नसल्याने आता राज्यभर एसटीची गावागावात मालवाहतूक सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

करोना संसर्ग रोखण्यासाठी २३ मार्चपासून लॉकडाऊनची घोषणा झाली. त्या दिवसापासून एसटी बसेसची वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे राज्यातील अठरा हजारावर बसेस डेपोमध्येच अडकल्या. यातून महामंडळाला रोज सुमारे २३ कोटीं रूपये पेक्षा अधिक उत्पन्नावर पाणी सोडावे लागत आहे. चार महिन्यात हा तोटा सुमारे अडीच हजारा कोटींपर्यंत पोहोचला आहे. तोटा वाढल्याने महामंडळाची आर्थिक अवस्था बिकट झाली. यातून कर्मचाऱ्यांचा पगार थांबवण्यात आला आहे. मार्च महिन्याचा २५ टक्के, मे महिन्याचा पन्नास टक्के पगार दिला नाही. दरमहा १ ते ७ तारखेपर्यंत पगार होतो. जुलै महिना संपला तरी अजूनही कर्मचारी जून महिन्याचा पगार कधी मिळेल याची प्रतीक्षा करत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे. यातूनच शुक्रवारी सांगली जिल्ह्यातील एका एसटी कामगाराने आत्महत्या केली. या घटनेतून कामगारांची मानसिक अस्वस्थता पुढे आली आहे.

 

लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर राज्यात जिल्हातंर्गत बससेवा सुरू करण्यात आली. मात्र याला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. बहुतांशी बसेस रिकाम्याच धावत असल्याने या सेवेतून अनेक ठिकाणी डिझेलचा खर्चही भागत नसल्याचे सांगण्यात येत आहे. याला पर्याय म्हणून उत्पन्न वाढवण्यासाठी मालवाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे. सुरूवातीला प्रमुख शहरात ही सेवा दिली जात होती. त्यातून तीन कोटीचे उत्पन्न मिळाले. त्याला मिळणारा प्रतिसाद पाहून आता मात्र गावागावांत ही सेवा देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी पाचशेवर ट्रकचा वापर करण्यात येणार आहे.