मुलगी त्रास देत असल्याने, तिला मारून टाकले

मुलगी त्रास देत असल्याने, तिला मारून टाकले

 

पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधील सांगवी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. त्रास देते म्हणून एका महिलेनं आपल्या पोटच्या चार वर्षीय मुलीची हत्या केली. या घटनेमुळं पुण्यात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी त्रास देत असल्यानं तिच्या आईनं पोटच्या चार वर्षांच्या मुलीचा भिंतीवर डोके आपटून आणि मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून खून केला. सासूच्या दशक्रिया विधीसाठी कुटुंबीय बाहेर गेले असताना पिंपरी-चिंचवडमधील भालेकर नगर, पिंपळे गुरव परिसरात ही हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना सोमवारी (२७ जुलै) सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. सविता दीपक काकडे (वय २२, रा. भालेकर नगर, पिंपळे गुरव, सांगवी) या निर्दयी मातेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर रिया दीपक काकडे (वय ४) असं मृत मुलीचं नाव आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी सांगितले की, दीपक काकडे यांच्या आईचे निधन झाले आहे. त्यांच्या दशक्रिया विधीसाठी काकडे कुटुंबीय सोमवारी सकाळी आळंदी येथे गेले होते. बाराच्या सुमारास काकडे कुटुंबीय घरी परतले, तेव्हा रिया निपचित पडली होती. ती खूप त्रास देत असल्याने तिला मारून टाकले असे सविता हिने कुटुंबीयांना सांगताच, सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. कुटुंबीयांनी धावपळ करीत तिला वैद्यकीय उपचार देण्याचा प्रयत्न केला, परंतु तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. रिया त्रास देत असल्याने तिच्या आईने तिचे डोके भिंतीवर, जमिनीवर आपटले. त्यानंतर मोबाईल चार्जरच्या वायरने तिचा गळा आवळला. रिया हिच्या कवटीचा पूर्णतः चुरा झाला असून, सविताने हे कृत्य केले कसे याचाही शोध घेतला जात आहे.