मुंबई अहमदाबाद महामार्गावर एसटी व इकोचा अपघात

मुंबई अहमदाबाद महामार्गावर एसटी व इकोचा अपघात

मुंबई अहमदाबाद महामार्गावर ढेकाळे येथे एसटी व इको वाहनाच्या भीषण अपघातात आगीचा भडका उडाल्याने दोन्ही वाहने जळून खाक झाली. मुंबई अहमदाबाद महामार्गावर एसटी व इको वाहनाच्या अपघातात इको वाहनातील दोघांचा मृत्यू झाला. इकोने पेट घेतल्याने इकोमधील चालक वाहनात अडकून पडला. गाडी पेटून त्याचा जागीच मृत्यू झाला. तर इकोमधील इतर एक गंभीर जखमी झालेला इसम उपचारादरम्यान मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात मृत झाल्याची माहिती दिली.

ढेकाळे उड्डाणपुलावर दुपारी दोन वाजताच्या सुमारास इको कार आणि एसटी बसचा हा अपघात झाला. अपघातानंतर इको कारने अचानक पेट घेतला. यामध्ये कार आणि एसटी बस जळून खाक झाली. बोईसर एसटी डेपोमधील ही एसटी बस बोरिवलीहून बोईसरकडे जात होती. एसटी बसच्या चालकाचे महामार्गावरील ढेकाळे उड्डाणपुलावर नियंत्रण सुटल्याने एसटी दुभाजक ओलांडून मुंबई वाहिनीवरील इको कारला धडकली. गंभीर अपघात घडल्याने अपघातात इको चालक केबिनमध्ये अडकून पडला. त्याला वाचविण्याचे प्रयत्न केले गेले, मात्र यादरम्यान आग भडकल्याने त्याचा जळून मृत्यू झाला. एसटी बसमध्ये कंडक्टरसह तीन प्रवासी सुखरूप असले तरी एसटी चालक किरकोळ जखमी आहे. अपघातामुळे काही काळ मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे.