मुंबईत पावसाने ४६ वर्षांचा पावसाचा विक्रम मोडला

मुंबईत पावसाने ४६ वर्षांचा पावसाचा विक्रम मोडला

मुंबई - मुंबई, ठाणे परिसरात सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला संततधार पाऊस मंगळवारीही अधूनमधून विश्रांती घेत हजेरी लावत होता. मात्र, बुधवारी पहाटेपासून पावसाने जोर धरला आणि मुंबई, ठाण्यात दाणादाण उडवली. सखल भाग, रस्ते, रेल्वेमार्ग जलमय झाले आणि वाहतुकीचे सर्वच मार्ग पाण्याने रोखले. मुंबईत तब्बल १४१ ठिकाणी झाडे कोसळली. सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे अनेक इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या, तर पाणीगळती रोखण्यासाठी झोपडय़ांवर घातलेले प्लास्टिक उडून गेल्याचं पाहायला मिळालं. पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालं. तर अनेक ठिकाणी ट्रेन आणि गाड्याही अडकल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, मुंबईतील कुलाबा परिसरात ऑगस्ट महिन्यातील गेल्या ४६ वर्षांचा पावसाचा विक्रम मोडल्याचं पाहायला मिळालं.

कुलाबा परिसरात ऑगस्ट महिन्यात तब्बल ४६ वर्षांनंतर १२ तासांमध्ये २९४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. कुलाबा परिसरात १९७४ च्या ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक २६२ मिमी पावसाची नोंद झाली होती. तर बुधवारी या ठिकाणी २९३.८ मिमी पावसाची नोंद झाली.