मुंबईत दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसानं हाहाकार माजवला

मुंबईत दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसानं हाहाकार माजवला

मुंबई - गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने आजही मुंबईला अक्षरशः झोडपून काढलं आहे. पावसामुळं मुंबईतील सखल भागात पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी झाली आहे. तसंच, मरिन लाइन स्थानकाशेजारील झाड कोसळल्यानं पश्चिम रेल्वेवरील लोकलसेवाही विस्कळीत झाली आहे. दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसानं हाहाकार माजवला आहे. मुंबईसह उपनगरात कोसळणाऱ्या पावसाचा जोर दुपारनंतर वाढला आहे. दक्षिण मुंबईत सोसाट्याचा वारा सुटल्यानं नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. जोराचा वारा आणि पाऊस यामुळं अनेक ठिकाणी झाड कोसळली आहेत. गेल्या १२ तासांत १५० मिमिपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. तर, पश्चिम द्रुतगती मार्गावरील मालाड येथे काल घडलेल्या दुर्घटनेमुळं आजही वाहतुक कोंडी झाली आहे.

मुंबईत मुसळधार पावसामुळं अनेक भागांत झाडांची पडझड झाली आहे. या दुर्घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी पार्किंगमध्ये असलेल्या गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दक्षिण मुंबईतील भायखळा, मरीन लाइन्ससह अनेक ठिकाणी झाडं कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. तर, मुंबईतील डि. वाय. पाटील स्टेडियमलाही पावसाचा फटका बसला आहे. अजूनही या भागात पावसाचा जोर कायम असून जसलोक रुग्णालयाच्या इमारतीचे पत्रेही उडून गेले आहेत. मुंबईतील दादर हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कल, माटुंगा, अंधेरी सबवे आणि कुर्ला परिसर जलमय झाला आहे. ताडदेव, स्लेटर रोड येथील डायना पुलाजवळ पाणी साचल्याने वाहने पाण्याखाली गेली आहेत.