मित्रांशी चॅटिंग करताना आईनं मारल्या हाका ; मुलानं घातल्या डोक्यात गोळ्या

मित्रांशी चॅटिंग करताना आईनं  मारल्या हाका ; मुलानं घातल्या डोक्यात गोळ्या

पाटणा: बिहारच्या सीतापूर गावात भयंकर घटना घडली आहे. मित्रांशी फोनवर चॅटिंग करण्यात मग्न असलेल्या मुलाला त्याच्या आईनं जेवायला बोलावलं. ती बराच वेळ बोलवत असल्यानं वैतागून मुलानं तिला गोळ्या घातल्या. या प्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.

मारांची पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सीतापूर गावात मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. अंगद यादव (वय २०) असं आरोपीचं नाव आहे. त्याला बुधवारी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडील गावठी पिस्तुल हस्तगत केलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंजू देवी (वय ५५) असं गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. सुरुवातीला तिला बेगुसरायच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. प्रकृती गंभीर असल्यानं बुधवारी तिला पाटणा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलला हलवण्यात आलं आहे. 

अंगद हा घराबाहेर होता. तो मोबाइलवर आपल्या मित्रांशी चॅटिंग करण्यात व्यग्र होता. तो उशिरा रात्री घरी आला. त्याच्या आईनं त्याला जेवण करण्यासाठी बोलावलं. घरात येण्यास सांगितलं. बऱ्याचदा आईनं त्याला सांगितलं पण तो काही घरात आला नाही. अखेर त्याची आई दरवाजात आली आणि त्याला पुन्हा जेवायला बोलावलं. अंगद रागारागानं घरात गेला आणि आईच्या डोक्यात गावठी पिस्तुलानं गोळ्या घातल्या. ती जागीच कोसळली. तिची जाऊ इंदू देवी त्यावेळी तिथे होती. इंदूच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी अंगदविरोधात गुन्हा दाखल केला, अशी माहितीही पोलिसांनी दिली.