भारत-नेपाळ सीमावादानंतर भगवान गौतम बुद्धांच्या जन्मस्थळांवरून वाद सुरू

भारत-नेपाळ सीमावादानंतर भगवान गौतम बुद्धांच्या जन्मस्थळांवरून वाद सुरू

भारत-नेपाळ यांच्यात संबंध सीमावादानंतर आता जन्मस्थळांवरून वाद सुरू झाला आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म भारतात झाल्याचं म्हटलं होतं. परराष्ट्र मंत्र्यांनी केलेल्या विधानानंतर नेपाळ भडकला आहे. नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयानं नाराजी व्यक्त करत गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमध्ये झाल्याचं स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे नेपाळनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा हवाला दिला आहे.

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी एका कार्यक्रमाला संबोधित करताना महात्मा गांधी व भगवान गौतम बुद्ध यांना भारतीय असल्याचं म्हटलं होतं. परराष्ट्र मंत्र्यांच्या या विधानावर नेपाळनं आक्षेप घेतला आहे. नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयानं याविषयी आपलं म्हणणं मांडलं आहे. “ऐतिहासिक आणि पुरातत्व पुराव्यांच्या आधारावर हे सिद्ध झालेलं आहे की, भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी येथे झाला होता. बुद्धांचं जन्मस्थळ युनेस्कोच्या वारसास्थळांच्या यादीतील स्थळांपैकी एक आहे,” असं नेपाळनं म्हटलं आहे.