बैरूतच्या आकाशात धुराचे लोळ होते, तर दुसरीकडे गगनचुंबी इमारती क्षणार्धात जमिनदोस्त झाल्या

बैरूतच्या आकाशात धुराचे लोळ होते, तर दुसरीकडे गगनचुंबी इमारती क्षणार्धात जमिनदोस्त झाल्या

 

लेबनानची राजधानी बैरूतमध्ये मंगळवारी दुपारच्या सुमारास भूकंप आल्यासारखी परिस्थिती होती. अनेक किलोमीटर अंतरावरील जमिनीवर कंपने जाणवत होती आणि नेमकं काय सुरू आहे, हे कळण्याच्या आतच दोन महाभयंकर स्फोटाने संपूर्ण शहराला हादरवून सोडले. बैरूतच्या आकाशात धुराचे लोळ होते तर दुसरीकडे गगनचुंबी इमारती क्षणार्धात जमिनदोस्त झाल्या होत्या. बैरूतमध्ये झालेल्या भीषण स्फोटामुळे फक्त लेबनानच नव्हे तर संपूर्ण जग हादरले होते. या स्फोटामुळे सगळ्या जगाला अमेरिकेने १९४५ मध्ये जपानमधील हिरोशिमामध्ये केलेल्या अणू बॉम्ब हल्ल्याची आठवण झाली. बैरूतच्या राज्यपालांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटामुळे जवळपास तीन लाख नागरीक बेघर झाले आहेत.

बैरूतमध्ये दुपारच्या सुमारास झालेल्या या स्फोटामुळे आतापर्यंत १०० जण ठार झाले असल्याचे समोर आले आहे. मृतांची संख्या वाढणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या स्फोटामुळे तीन लाख नागरिकांना बेघर केले असल्याची माहिती बैरूतचे राज्यपाल मरवान अबाउद यांनी केली आहे. बैरूतच्या गल्लीबोळात बचावकार्य सुरू आहे. ही सगळ्यात मोठी आणि भीषण आपत्ती असल्याची माहिती रेडक्रॉसच्या स्वयंसेवकांनी दिली. बैरुतच्या रस्त्यांवर अनेक वाहने उभी असून स्फोटामुळे त्यांचे नुकसान झाले आहे. तर, कोसळलेल्या इमारतीच्या मातीचे ढिग पडले आहेत.