बॉयलरच्या स्फोटात पाच कामगारांचा मृत्यू

बॉयलरच्या स्फोटात पाच कामगारांचा मृत्यू

नागपूर - बेला येथील मानस अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीत बॉयलरचा स्फोट होऊन पाच कामगारांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर कामगारांनी सुरक्षा आणि नुकसानभरपाईचा मुद्दा उपस्थित करून कारखान्यात गर्दी केली आणि मृतदेह अडवून ठेवले. अखेर मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत आणि कुटुंबातील एकाला नोकरीचे आश्वासन कंपनीने दिल्यानंतर तणाव निवळला.

दुर्घटनेतील मृतांची नावे मंगेश प्रभाकर नौकरकर (२१), लीलाधर वामनराव शेंडे (४२), वासुदेव विठ्ठल लडी (३०), प्रफुल्ल पांडुरंग मून (२५) आणि सचिन प्रकाश वाघमारे (२४) अशी आहेत. ते सर्व वडगाव येथील रहिवासी होते. बेला पोलीस ठाण्याच्या हद्दीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पुत्र निखिल गडकरी यांचा ‘मानस अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज’ हा साखर कारखाना आहे. पूर्वी हा कारखाना पूर्ती या नावाने ओळखला जात होता. शनिवारी कारखान्याचे उत्पादन सुरू होते. त्याच वेळी एका बॉयलरच्या टाकीची दुरुस्तीही सुरू होती. अनेक दिवसांपासून ही टाकी बंद होती. तिची दुरुस्ती जोडतंत्री (वेल्डर) सचिन आणि इतर मदतनीस करीत होते. त्या वेळी म्हणजे दुपारी २.१५ वाजता बॉयलरचा स्फोट झाला आणि पाच मजुरांचा होरपळून जागीच मृत्यू झाला.