‘पहले मंदिर, फिर सरकार’ म्हणणारे ठाकरे आता ‘पहले सरकार, फिर मंदिर’ म्हणताहेत - रावसाहेब दानवे

‘पहले मंदिर, फिर सरकार’ म्हणणारे ठाकरे आता ‘पहले सरकार, फिर मंदिर’ म्हणताहेत - रावसाहेब दानवे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनासाठी जाणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे अयोध्येला नक्की जातील असं सांगितलं आहे. दरम्यान भाजपा नेते आणि अन्न व नागरी पुरवठा राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली असून निमंत्रण आले नाही तरी राम भक्त म्हणून उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार का? असा सवाल विचारला आहे. तसंच पहले मंदिर फिर सरकार म्हणणारे ठाकरे आता पहले सरकार फिर मंदिर म्हणत आहेत असा टोलाही लगावला आहे. झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे की, ‘निमंत्रण आले नाही तरी राम भक्त म्हणून उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार का? हवं तर सरकारमधील सहकाºयांची परवानगी घेऊन त्यांनी अयोध्येत जावं. प्रभू रामासाठी मानपान कसला. पहले मंदिर फिर सरकार म्हणणारे उद्धव ठाकरे आता पहले सरकार फिर मंदिर म्हणत आहे. उद्धव ठाकरे सर्व पातळीवर नापास झाले असून, हे नापासांचं सरकार आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे.