पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू

पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा  पाण्यात बुडून मृत्यू

जळगाव - नाल्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन दहावीत शिकणाऱ्या शाळकरी विद्यार्थी मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील वाघोदे शिवारामध्ये घडली आहे. भावेश बळीराम देसले (वय १५), हितेश सुनील पवार (वय १५ रा. लोंढवे) अशी मृतांची नावे आहेत.

अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथील स्व.एस.एस.पाटील माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीत शिकणारे भावेश देसले, हितेश पवार आणि जयवंत सुरेश पाटील हे तिघे मित्र शनिवारी जवळच असलेल्या तुडंब भरुन वाहणाऱ्या नाल्यात पोहण्यासाठी गेले होते. भावेश देसले आणि हितेश पवार हे दोन्ही १५ फूट खोल पाण्यात गेले आणि काही वेळातच ते बुडू लागले. दोन्ही मित्र बुडत असल्याचे पाहून जयंवत घाबरला. त्याने दोघांना वाचवण्यासाठी आरडाओरडा केला, परंतु जवळ कोणीच नसल्याने मदतीला कोणीही आले नाही. यानंतर त्याने गावात धाव घेऊन दोघे मित्र पाण्यात बुडल्याची माहिती दिली. लगेच भावेश, हितेश यांच्या कुटुबीयांसह ग्रामस्थ त्यांच्या शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब पाटील, सरपंच कैलास खैरनार यांनी घटनास्थळी धाव घेतली. पण तोपर्यंत दोघेही पाण्यात बुडाले होते. नंतर पट्टीच्या पोहणाऱ्यांनी नाल्यातून दोघांचे मृतदेह बाहेर काढले. दोघांच्या कुटुंबीयांनी प्रचंड आक्रोश केला होता.