नागपूर - पबजीच्या वेडापायी पोलिसाच्या मुलानं केली आत्महत्या

नागपूर - पबजीच्या वेडापायी पोलिसाच्या मुलानं केली आत्महत्या

नागपूर - पबजीच्या वेडापायी पोलिसाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना योगेंद्र नगरमधील नर्मदा अपार्टमेंटमध्ये आज, सोमवारी सकाळी उघडकीस आली. राजवीर नरेंद्र ठाकूर (वय १३) असे मृताचे नाव आहे. तो सहावीत शिकत होता. त्याचे वडील नरेंद्र हे गुन्हे शाखेत कार्यरत आहेत.
राजवीर याचा आॅनलाइन अभ्यास सुरू झाल्याने काही दिवसांपूर्वीच नरेंद्र यांनी त्याला मोबाइल व टॅब घेऊन दिला. अभ्यास संपल्यानंतर तो मोबाइलवर पबजी खेळायचा. रविवारी रात्री दीड वाजता तो मोबाइलवर पबजी खेळला. त्यानंतर अखेरची पातळी गाठण्यात त्याला अपयश आले. या दरम्यान त्याने खिडकीला ओढणी बांधली. तोंडावर उशी ठेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी त्याची आई प्रियंका या झोपेतून जाग्या झाल्या. त्यांनी नरेंद्र यांना जागे केले. नरेंद्र हे हॉलमध्ये आले. राजवीर हा गळफास लावलेला दिसला. नरेंद्र यांनी लगेच त्याच्या गळ्यातील फास काढला. भावाच्या मदतीने राजवीर याला अ‍ॅलेक्सिस हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून राजवीर याला मृत घोषित केले. पबजीच्या वेडापायी त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. गिट्टीखदान पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

सुनंदा घाडगे - प्रतिनिधी