तुम्ही कोरोनाबाधित आहात की नाही हे मोबाईलवरुन तुम्हांला अवघ्या 30 सेकंदात समजू शकेल

तुम्ही कोरोनाबाधित आहात की नाही हे मोबाईलवरुन तुम्हांला अवघ्या 30 सेकंदात समजू शकेल

मुंबई - येत्या काळात तुम्ही कोरोनाबाधित आहात की नाही हे तुमच्या हातातल्या मोबाईलवरुन तुम्हांला अवघ्या 30 सेकंदात समजू शकणार आहे. येत्या काळात कुठेही जाताना सॅनिटायझर, मास्क सोबतच मोबाईलमधील एक ॲप देखील तुम्हाला कोरोनापासून सुरक्षित ठेऊ शकेल. स्वॅब टेस्ट, अँटीजेन आणि अँटीबॉडी तपासणीनंतर आता रुग्णाच्या ध्वनी लहरींवरुन कोरोनाच निदान होण्याची शक्यता आहे. ध्वनी लहरींवरुन (आवाजावरुन) कोरोना पॉझिटीव्ह किंवा निगेटीव्ह असल्याचे निदान केले जाऊ शकते. यासाठी, इस्रायलच्या कंपनीने तयार केलेल्या ॲप आणि सर्व्हरच्या माध्यमातून ही टेस्ट होऊ शकते.

हे ॲप मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन काही ठरावीक सेकंदापर्यंत वोकल टेस्ट दिली जाईल. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करुन सिव्हीयर, मिडीयम आणि लो रिस्क अश्या तीन वर्गात त्याचा निकाल सांगितला जाईल. या तंत्राला वोकल बायोमार्कर टेस्ट असं म्हटलं जातं. सध्या मुंबईत या तंत्राच्या प्रायोगिक चाचणीसाठी एथिक कमिटीच्या अहवालाची प्रतिक्षा आहे. त्यानंतर, पुढच्या आठवड्यापासून नेस्कोच्या जंबो केअर सेंटरमधिल संशयित आणि कोविड -19 रूग्णांच्या आवाजाची तपासणी केली जाईल.