झाडाला धडकून दुचाकी चालक तरूण ठार

झाडाला  धडकून दुचाकी चालक तरूण ठार

पाटणा - बिहारमधील बांका जिल्ह्यात थरारक घटना घडली आहे. तोंडावर मास्क लावला नसल्यानं पोलिसांनी दुचाकीस्वाराचा पाठलाग केला. पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्याच्या नादात दुचाकी झाडाला धडकून भीषण अपघात झाला. यात २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तर त्याचा १८ वर्षीय मित्र रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.

संतोष यादव आणि मंजेश यादव हे दोघे काटोरिया मार्केटमध्ये खरेदीसाठी गेले होते. मात्र, या दोघांनी मास्क घातला नव्हता. लॉकडाउनचे नियम मोडल्यानं पोलिसांनी त्यांना सिग्नलवर थांबण्यास सांगितलं. मात्र, दंड भरावं लागेल म्हणून ते दोघे घाबरून दुचाकीवरून पळाले. बंदोबस्तावर असलेल्या दोन पोलिसांनी दुचाकीवरून या दोघांचा पाठलाग केला. जवळपास दोन किलोमीटरपर्यंत हा थरार सुरू होता. दुचाकी वेगानं पळवण्याच्या नादात त्यांची दुचाकी काटोरिया-सुईया मार्गावरील एका झाडाला धडकली. यात संतोष यादव आणि मंजेश हा गंभीर जखमी झाला. या दोघांना काटोरिया रुग्णालयात नेलं असता, संतोषचा मृत्यू झाला. तर मंजेश हा गंभीर जखमी असून, तो मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेला मंजेशच्या कुटुंबीयांनी पोलिसांना जबाबदार धरलं आहे.

या घटनेनंतर ग्रामस्थ आक्रमक झाले असून, संबंधित पोलिसांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणी मृताचे वडील जीवू यादव यांनी तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी नोंद करून घेतली आहे. दोघांनी मास्क घातले नव्हते, तसंच हेल्मेटही घातला नव्हता, असं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणी बांकाचे पोलीस अधीक्षकांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.