जेष्ठ अभिनेत्री आशालता यांचा करोनामुळे मृत्यू; सातार्‍यातील खासगी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास.

जेष्ठ अभिनेत्री आशालता यांचा करोनामुळे मृत्यू; सातार्‍यातील खासगी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास.

जेष्ठ अभिनेत्री आणि गायिका आशालता वबगावकर यांचे साताऱ्यामध्ये आज दि. २२ सप्टेंबर,२०२० रोजी  उपचारादरम्यान दुःखद निधन झाले मृत्यूसमयी त्या ७९ वर्षांच्या होत्या, त्यांच्या निधनाने चित्र / नाट्यसृष्टी मध्ये पोकळी निर्माण झाली. 

आशालता वाबगावकर यांच्या  अभिनय कारकीर्दीतील त्यांचे मत्स्यगंधा हे नाटक मैलाचा दगड ठरले. इतक्या वर्षांनंतरही त्यांनी साकारलेली ‘मत्स्यगंधा’ आजही रसिकांच्या स्मरणात आहे. नाटकातील त्यांनी गायलेली ‘गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफेकळी’, ‘अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा’ ही नाटय़पदे गाजली. ही नाटय़पदे आजही लोकप्रिय व रसिकांच्या ओठावर आहेत. वसंत कानेटकर लिखित आणि मा. दत्ताराम दिग्दर्शित या नाटकाचे संगीत पं. जितेंद्र अभिषेकी यांचे होते. नाटकातील संगीताने पं. अभिषेकी यांनी नाटय़संगीताचा बाज बदलला, त्याला नवे रूप दिले. नाटकातील ‘सत्यवती’ (मत्स्यगंधा)च्या भूमिकेसाठी त्यांची  निवड झाली. अठरा वर्षांची अल्लड तरुणी, पराशराकडून फसविली गेलेली आणि सूड घेण्याची प्रतिज्ञा करणारी राजकन्या आणि आयुष्य पूर्णपणे हरलेली राजमाता अशा १८ ते ७० वर्षे वयोगटातील विविध  छटा  यातून सादर करायच्या होत्या.  ते एक आव्हानच  होते.  
१ मे १९६४ रोजी बिर्ला मातोश्री सभागृहात नाटकाचा पहिला प्रयोग सादर झाला. सकाळी साडेनऊ वाजता सुरू झालेले नाटक दुपारी अडीचच्या सुमारास संपले. संगीत आणि नाटय़पदे हा या नाटकाचा मूळ आत्मा. पुढे काही प्रयोगांनंतर ते नाटक अधिक आटोपशीर व कमी करण्यात आले. या नाटकाने त्यांना  खूप नावलौकिक आणि प्रसिद्धी मिळवून दिली. त्यांची  स्वतंत्र ओळख निर्माण झाली. म्हणूनच  आजवरच्या अभिनय प्रवासात हे नाटक त्यांना महत्त्वाचे वाटते .

‘मत्स्यगंधा’ च्या यशानंतर नंतर आशालता यांनी मागे वळून पाहिलेच नाही. नाटक पूर्णवेळ करायचे असे ठरवून त्यांनी नोकरी सोडली. ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’, ‘चंद्रलेखा’, ‘मुंबई मराठी साहित्य संघ’, ‘माऊली प्रॉडक्शन’, ‘कलामंदिर’, ‘आयएनटी’ आदी नाटय़संस्थांमधून त्यांनी आजवर पन्नासहून अधिक नाटके केली आहेत. या सर्व नाटकांचे मिळून पाच हजारांहून अधिक प्रयोग त्यांनी केले आहेत. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘मदनाची मंजिरी’, ‘गारंबीचा बापू’, ‘गुडबाय डॉक्टर’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘स्वामी’, ‘गरुडझेप’, ‘तुज आहे तुजपाशी’, ‘हे बंध रेशमाचे’, ‘विदूषक’, ‘ही गोष्ट जन्मांतरीची’, ‘भावबंधन’, ‘गुंतता हृदय हे’, ‘छिन्न’, ‘देखणी बायको दुसऱ्याची’ ही त्यांची काही गाजलेली नाटके. पु. ल. देशपांडे यांनी दूरदर्शनसाठी केलेल्या ‘वाऱ्यावरची वरात’मध्येही त्या होत्या. ‘सावित्री’, ‘उंबरठा’, ‘पुढचं पाऊल’, ‘माहेरची साडी’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘एकापेक्षा एक’, ‘आत्मविश्वास’ आणि अन्य शंभर मराठी चित्रपटही त्यांच्या नावावर आहेत.

त्यांनी गायलेली ‘तू सुखकर्ता तू दु:खहर्ता विघ्नविनाशक मोरया संकटी रक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया’ ही आरती आजही लोकप्रिय आहे. गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात दरवर्षी ही आरती वाजविली जाते. ‘एचएमव्ही’ कंपनीने त्याची ध्वनिमुद्रिकाही काढली.चांद भरली रात आहे’, ‘चांदण्यांची रोषणाई मी कधी ना पाहते’, ‘राजसा  राजकुमारा’(नाटक-विदूषक, तीनही गाण्यांचे संगीतकार श्रीनिवास खळे), ‘जन्म दिला मज त्यांनी’, ‘तव भास अंतरा झाला मन रमता मोहना’ (मत्स्यगंधा), ‘रवी किरणांची झारी घेऊनी’ (भावगीत) ही त्यांनी गायलेली अन्य काही गाणी.  
   

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडल सातारा शाखेतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धान्जली 
महेश देशपांडे