जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वेगाने वाढत आहे

जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वेगाने वाढत आहे

जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वेगाने वाढत आहे. अशात वाहन कंपन्या अधिकाधिक रेंज असणाऱ्या गाड्या बाजारात आणण्याचा प्रयत्न करत आहे. दक्षिण कोरियाची प्रमुख कंपनी ह्युंडाईने काही दिवसांपुर्वीच भारतीय बाजारात आपली इलेक्ट्रिक एसयूव्ही ह्युंडाई कोनाला लाँच केले होते. या एसयूव्हीने ड्रायव्हिंग रेंजमध्ये एक नवीन विक्रम रचला आहे. जर्मनीच्या Lausitzring सर्किटमध्ये या एसयूव्हीने सिंगल चार्जमध्ये 1,026 किमीचे अंतर पार केले. कंपनीने एसयूव्हीच्या 3 मॉडेलचे टेस्टिंग केले. या मॉडेल्सने सिंगल चार्जमध्ये क्रमशः 1018.7 किमी, 1024.1 किमी आणि 1026 किमीचे अंतर पार केले. कंपनीचा दावा आहे की टेस्ट करण्यात आलेल्या मॉडेलमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करण्यात आलेले नाहीत. केवळ चांगल्या मायलेजसाठी एअर कंडिशन आणि एंटरटेनमेंट सिस्टमला बंद ठेवण्यात आले होते.

ह्युंडाईनुसार, यावेळी गाडीला ताशी 30 किमी वेगाने चालविण्यात आले. कारमध्ये केवळ 3 टक्के चार्जिंग असतानाही  सर्व मॉडेल्सने 20 किमी अंतर पार केले. एसयूव्हीने प्रति 100 किमी जवळपास 6 kWh पॉवर खर्च केली. ही चाचणी जवळपास 35 तास सुरू होती. दरम्यान, कंपनीने या इलेक्ट्रिक एसयूव्हीला मागील वर्षी भारतात लाँच केले होते. ह्युंडाईच्या प्रिमियम व्हेरिएंटची किंमत 23.75 लाख रुपये आणि ड्युअल टोन व्हेरिएंटची किंमत 23.94 लाख रुपये आहे.