चीन-पाकिस्तानची झोप उडवणारं ‘हॅमर’

चीन-पाकिस्तानची झोप उडवणारं ‘हॅमर’

पुढच्या आठवडयात भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात 'राफेल' हे अत्याधुनिक फायटर विमान दाखल होईल. फोर प्लस जनरेशनचे असलेले हे फायटर विमान अनेक अंगांनी वैशिष्टयपूर्ण आहे. आपला पारंपारिक शत्रू असलेल्या पाकिस्तानकडे सध्या तरी 'राफेल'च्या तोडीचं कुठलही फायटर विमान नाहीय. राफेलचे हरयाणाच्या अंबाला बेसवर लँडींग होईल, त्यावेळी ते मिटिओर, स्काल्प सारख्या घातक मिसाइल्सनी सुसज्ज असेल.

इंडियन एअर फोर्स आता राफेलला अधिक घातक बनवण्याचा विचार करत आहे. राफेलसाठी नवीन स्मार्ट वेपन खरेदी करण्याची योजना आहे. फ्रेंच बनावटीच्या या नव्या शस्त्रामुळे विमानाच्या कॉकपीटमध्ये बसलेल्या वैमानिकाला जमिनीवर असणाऱ्या ६० किलोमीटर अंतरावरील लक्ष्याचा अत्यंत अचूकतेने वेध घेता येईल. चीन बरोबर सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हॅमरची खरेदी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

इंडियन एअर फोर्स राफेलसाठी हॅमर (हायली एजाइल मॉड्यूलर म्यूनिशन एक्सटेंडेड रेंज) हे नवीन स्मार्ट वेपन खरेदी करण्याची तयारी करत आहे. पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने तिन्ही सैन्य दलांना इमर्जन्सीमध्ये शस्त्रास्त्र खरेदी करण्याचे अधिकार दिले आहेत. त्या अंतर्गत हॅमरची खरेदी करण्यात येईल.

बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘राफेल’ फायटर विमानांची पहिली तुकडी येत्या २९ जुलै रोजी भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. हरयाणामधील अंबाला एअर फोर्स स्टेशनवर ही राफेल फायटर विमाने तैनात करण्यात येतील. युद्धात गेम चेंजर ठरु शकणाऱ्या या विमानांचा अंबाला एअर बेसवर मुख्य तळ असणार आहे.

चीनच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी लगेच पूर्व लडाखमध्ये ही विमाने तैनात केली जाऊ शकतात. हॅमर हा एक ‘गायडन्स किट’ आहे. म्हणजे ज्याला मार्गदर्शक म्हणता येईल. या किटमध्ये Mk80 सीरीजचे बॉम्ब वापरावे लागतील. फ्रान्सची डिफेन्स कंपनी साफरानकडून हॅमर किटची निर्मिती केली जाते. हॅमर विकत घेतल्यानंतर आपल्याला Mk80 सीरीजचे बॉम्ब आयात करावे लागतील. भारतातही नंतर या बॉम्बचे उत्पादन होऊ शकते असे दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

भारताने मागच्यावर्षी बालाकोट एअर स्ट्राइकच्यावेळी स्पाइस २००० बॉम्बचा वापर केला होता. हॅमर सुद्धा स्पाइस सारखाच स्मार्ट बॉम्ब आहे. भारताने दोन ते तीन वर्षांपूर्वीच हॅमर स्मार्ट बॉम्बची खरेदी करण्यासाठी बोलणी सुरु केली होती. शत्रूच्या टप्प्यात न येता शत्रूच्या प्रदेशातील खोलवर भागातील लक्ष्याचा अत्यंत अचूकतेने वेध घेता येतो. डोंगराळ भागासह कुठल्याही भागातील शत्रूने बनवलेले मजूबत बंकर हॅमर बॉम्बने उद्धवस्त करता येतील. सध्या पूर्व लडाखमध्ये जो, तणाव निर्माण झालाय तो उंच पर्वतीय भाग आहे.