चीनच्या सीमेवर आता ‘भारत’ ड्रोनद्वारे टेहळणी

चीनच्या सीमेवर आता ‘भारत’ ड्रोनद्वारे टेहळणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत व चीनमध्ये सीमावर्ती भागात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, आता संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून (डीआरडीओ) भारतीय लष्कराला एक विशेष अत्याधुनिक ड्रोन तयार करून देण्यात आले आहे. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या भागावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी या ड्रोनची मदत होणार आहे. संपूर्ण भारतीय बनावटीचे असलेल्या या अत्याधुनिक ड्रोनला ‘भारत’ असे नाव देण्यात आलेले आहे. लाईन ऑफ अ‍ॅक्च्युअल कन्ट्रोल (एलएसी)वर बारकाईने लक्ष देण्याबरोबरच हे ड्रोन उंचीवरील भाग आणि पर्वतीय भागांमध्ये देखील लक्ष ठेवण्यास भारतीय लष्कराला मदत करणार आहे.


भारतीय लष्कराला पूर्व लडाख क्षेत्रात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी विशेष ड्रोनची आवश्यकता होती. यासाठी डीआरडीओकडून ‘भारत’ ड्रोन देण्यात आले आहे. असे संरक्षण क्षेत्रातील सुत्रांकडून एएनआयला सांगण्यात आले आहे. भारत-चीन सीमेवरील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘भारत’ ड्रोनची निर्मिती डीआरडीओच्या चंदीगड येथील प्रयोगशाळेत करण्यात आली आहे. हे ड्रोन ‘भारत’ मालिकेतील जगातील सर्वात वेगवान व वजनानी हलके असे पाळत ठेवणारे ड्रोन असून, पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे असल्याचे सांगण्यात आले आहे.