कोल्हापूर, सांगली नदीकाठावर असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा

कोल्हापूर, सांगली नदीकाठावर असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा

कोल्हापूर/सांगली - मागील वर्षी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला पावासाचा मोठा फटका बसला होता. अतिवृष्टीमुळे या भागात महापूर आल्याने अतोनात नुकसान झालं होतं. तशीच काहीशी परिस्थिती यंदाही होताना दिसत आहे. यंदाच्या पावसाळ्यात कोल्हापुरात पंचगंगा नदी ही पहिल्यांदाच पात्राच्या बाहेर पडली आहे. गेल्या 24 तासांत पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत तब्बल 16 फुटांनी वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदीकाठावर असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर सलग दुसऱ्या दिवशी सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे.

गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होताना पाहायला मिळत आहे. सध्या पंचगंगा ही 31 फुटांवरून वाहत आहे. परिणामी नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केलं आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून पंचगंगा आज रात्री इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.