कुलरचा शॉक लागून तीन चिमुकल्या बहिणींचा मृत्यू

कुलरचा शॉक लागून तीन चिमुकल्या बहिणींचा मृत्यू

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील कोदुर्ली येथे कुलरचा शॉक लागून तीन चिमुकल्या बहिणींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आज (गुरुवार) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. रिया (९), संचिता (७) आणि मोनीता गजानन भूस्सेवार (५) अशी या मृत बहिणींची नावे आहेत. या दुर्घटनेत तीन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

या तिघींचे आई, वडील दोघेही शेतात गेले होते. घरी तिघी बहिणीच होत्या. त्या जेवणाकरिता एकत्र बसल्या. तेव्हा रिया कुलर लावण्याकरिता गेली असता तिला कुलरमधून विजेचा जबर धक्का बसला. दरम्यान, तिला वाचविण्याकरिता संचिता व मोनीता पुढे सरसावल्या. त्यांनाही विजेच्या जबर धक्का बसला. या घटनेत तिघींचाही जागीच करुण अंत झाला. ही बाब घराशेजारच्या एका आजीबाईंना लक्षात आली. त्यांनी आरडाओरड करताच शेजारी घटनास्थळी धावून आले. पुढ्यात जेवणाचे ताट वाढून असताना कुलरसमोर तिन्ही चिमुकल्या बहिणींचे मृतदेह पडून होते. हे दृश्य बघून गावकरी हेलावून गेले.

राळेगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेतले व पंचनामा करिता रवाना केले. पोलीस अधिक तपास करीत आहे. घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.