कोरोना उपचार नंतर श्वसनाचा त्रास

कोरोना उपचार नंतर श्वसनाचा त्रास

 

मुंबई - कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर नियमाप्रमाणे उपचार घेऊन घरी गेल्यानंतर कालांतराने 22 रुग्णांना फुफ्फुसाच्या व्याधी, म्हणजे श्वसनाचा त्रास झाल्याने पुन्हा परळ येथील केइएम रुग्णालयात भरती व्हावे लागले आहे. या सर्वाना घरी गेल्यानंतर काही काळाने श्वासोच्छवास घेण्याकरिता त्रास झाल्याने त्यांनी पुन्हा हॉस्पिटलचा मार्ग धरला. तेथे या सर्वांना दाखल करून घेण्यात आले असून सर्व जणांची चाचणी कोरोना निगेटिव्ह असून त्यांना नियमित रुग्णलयाच्या कक्षात उपचार दिले जात आहे. गेले दोन महिन्यात हे रुग्ण दाखल झाले असून त्यांना सर्वाना ऑक्सिजन वर ठेऊन उपचार देण्यात आले आहे. तर 10 रुग्णांना उपचार देऊन घरी पाठविण्यात आले आहे तर 12 रुग्ण अजूनही उपचार घेत आहेत. या सर्व रुग्णांपैकी काही रुग्णांना घरी गेल्यानंतरही श्वसनाचा त्रास होऊन नये म्हणून ऑक्सिजन मशीनचा वापर घरी करावा लागणार आहे.

 

शास्त्रीय भाषेत या अशा व्याधींना पोस्ट इन्फेकशन फायब्रोसिस असेही म्हणतात. ज्या संसर्गामध्ये फुफ्फसांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो आणि उपचारानंतर काही वेळा फुफ्फुसातील जखम बरी झाल्यानंतरही त्याचवरचे व्रण कायम राहतात. त्यावेळी थोडया फार प्रमाणात फुफ्फुसाची कार्यशक्ती मंदावते. मग अशावेळी रुग्णाला श्वास घेण्यासाठी त्रास होतो, अशा वेळी त्यांना तात्पुरते रुग्णालयात दाखल करून योग्य ते उपचार करून घरी जातात येते. तर मात्र अशा काही रुग्णांना ऑक्सिजन मशीनचा वापर घरी करावा लागत असल्याचे दिसून येते.