कॅप्टनने टीमवर नियंत्रण ठेवावे - शरद पवार

कॅप्टनने टीमवर नियंत्रण ठेवावे - शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शनिवारी औरंगाबाद जिल्ह्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेतला. ८०व्या वर्षी तुम्ही फिल्डवर असताना मुख्यमंत्री का फिरत नाहीत, असा प्रश्न पत्रकारांनी पवार यांना विचारला. त्यावर पवार यांनी ठाकरे यांच्या कामाचे कौतुक करीत कार्यशैली समजावून सांगितली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईत असले तरी राज्यभरातील करोना परिस्थितीचा नियमित आढावा घेत आहेत. दिवसभर त्याच कामात ते बुडालेले असतात. पालकमंत्री आणि इतर मंत्री त्यांना प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थिती आणि आवश्यक उपाययोजनांची माहिती सांगतात. त्यानुसार तातडीने उपाययोजना करण्यात येत आहेत. कॅप्टनने टीमवर नियंत्रण ठेवावे. त्यांची टीम राज्यभर फिरत आहे. एका जिल्ह्यात येऊन हाताळावी अशी परिस्थिती नाही. मुख्यमंत्र्यांचे काम योग्य पद्धतीने सुरू आहे, असे पवार म्हणाले. मला एका जागी बसवत नाही. मी लोकांमध्ये राहणारा माणूस असल्यामुळे फिरत असतो, असेही पवार म्हणाले. हा दौरा झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

 

केंद्राने दिलेली मदत अजून राज्यात आलेली दिसत नाही. आता उद्योगधंदा कसा सुरू होईल याकडे लक्ष द्यायला हवे. जसा आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे तसाच राज्याचा आर्थिक प्रश्नही महत्त्वाचा असून, राज्याची आर्थिक बाजू बळकट करण्यासाठी औद्योगिक क्षेत्र सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. करोना संकटावर मात करायची तर सर्वांनी एकत्र लढले पाहिजे. देशातील साधारण पाच-सहा राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढलेला दिसत आहे. त्यापैकी महाराष्ट्र राज्य महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, कल्याण, डोंबिवली, औरंगाबाद या भागातील परिस्थिती काळजी करण्यासारखी आहे, असेही शरद पवार म्हणाले.