ऑलराऊंडर बेन स्टोक्स

ऑलराऊंडर बेन स्टोक्स

वेस्ट इंडिजविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत धडाकेबाज कामगिरी करणारा बेन स्टोक्स याला ICC च्या ताज्या क्रमवारीत बढती मिळाली. ICC ने ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली. त्यात अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत त्याने अव्वल स्थान पटकावले. त्याने वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर याला खाली ढकलत अव्वलस्थान पटकावले. स्टोक्सची कारकिर्दीतील ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

वेस्ट इंडिजला दुसऱ्या कसोटीत पराभूत करताना स्टोक्सने दमदार कामगिरी केली. पहिल्या डावात त्याने दीडशतक (१७६) तर दुसऱ्या डावात नाबाद अर्धशतक (७८) ठोकले. दोन्ही डाव मिळून त्याने ३ बळी घेतले. या कामगिरीसाठी स्टोक्सला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्याच्या धमाकेदार कामगिरीनंतर भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण याने त्याची स्तुती केली. “जर टीम इंडियाकडे बेन स्टोक्ससारखा अष्टपैलू खेळाडू असेल, तर भारतीय संघ जगाच्या पाठीवर कुठेही अजिंक्य राहू शकतो”, अशा शब्दात पठाणने त्याची स्तुती केली. तसेच मॅचविनर असा हॅशटगही स्टोक्ससाठी वापरला.