ऑगस्ट महिन्यामध्ये सिनेमागृहं सुरू करण्याचा सल्ला

ऑगस्ट महिन्यामध्ये सिनेमागृहं सुरू करण्याचा सल्ला

गेल्या चार महिन्यांपासून चित्रपटगृहं बंद असल्यामुळे नवीन चित्रपटांचं प्रदर्शन खोळंबलं आहे. मनोरंजनसृष्टी नव्या जोमानं कार्यरत होण्यासाठी थिएटर सुरू व्हावी म्हणून सिनेमागृहमालक थिएटर उघडण्यासाठी परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. केंद्र सरकारनं अनलॉक संदर्भातील मार्गदर्शक सूचना यापूर्वी जाहीर केल्या होत्या; तेव्हा सिनेमागृहं अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात कार्यन्वित करण्याविषयी सूतोवाच केलं गेलं होतं. म्हणून ऑगस्ट महिन्यात सुरू होणाऱ्या अनलॉक तीनच्या टप्प्यात थिएटर उघडण्याची परवानगी मिळेल या आशेवर देशभरातील सिनेमागृहांचे मालक आहेत.

अनलॉकच्या पहिल्या दोन टप्प्यांमध्ये विविध उद्योग, व्यवसाय हळूहळू पुन्हा कार्यान्वित होताना दिसले. गेल्या काही दिवसांपासून मालिका-चित्रपटांचं चित्रीकरणही सुरू झालं आहे. आता अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात, अर्थात पुढील महिन्यापासून सिनेमागृहं उघडण्यासाठी परवानगी मिळेल याकडे मल्टिप्लेक्स आणि सिनेमागृहमालकांचं लक्ष लागून राहिलं आहे. माहिती आणि प्रसारण खात्यानं केंद्रीय गृह मंत्रालयाला, ऑगस्ट महिन्यामध्ये सिनेमागृहं सुरू करण्याचा सल्ला दिला आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अमित खरे यांनी सीआयआय मीडिया समितीशी नुकतीच याबाबत बातचीत केली आहे. यात त्यांनी समितीला सांगितलं की, आगामी १ ऑगस्टपासून संपूर्ण देशात सिनेमागृहं सुरू करण्यासाठी केंद्र सरकारनं परवानगी द्यावी. अथवा किमान ३१ ऑगस्टपर्यंत तरी परवानगी देण्यात यावी, असा सल्ला त्यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला दिला आहे. या सल्ल्यावर केंद्रीय गृहमंत्रालय गांभीर्यानं विचार करत असल्याचं कळतंय. याबाबत अधिकृत माहिती केंद्रानं अद्याप जाहीर केलेली नाही. सिनेमागृह मालक अक्षय राठी सांगतात की, 'देशभरातील लाखो लोकांचा रोजगार हा सिनेमागृहांशी जोडला गेलेला आहे. त्यामुळे आता पुढे आणखी काही महिने सिनेमागृहं बंद ठेवून चालणार नाही. देशभरातील सिनेमागृहमालक आणि तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठ्या आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. त्यामुळे केंद्रानं सिनेमागृह सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी आमची इच्छा आहे. सिनेमागृहात प्रेक्षकांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेण्यासाठी आम्ही पूर्ण तयारी केली आहे.'