आर. माधवन घेऊन येतोय रॉकेट्राय - नॅम्बी इफेक्ट

आर. माधवन घेऊन येतोय रॉकेट्राय - नॅम्बी इफेक्ट

हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक वेगवेगळे प्रयोग होताना दिसतायत. त्यातही बायोपिकचं सध्या मोठं पीक आलं आहे. काही दिवसांपूर्वीच शकुंतला देवी हा चित्रपटही ह्युमन कॉम्प्युटर शकुंतला देवींवर बेतला होता. यापूर्वी बरेच बायोपिक आले आहेत. उदाहरणादाखल मिल्खा सिंह, मेरी कोम, महेंद्रसिंह धोनी आदी अनेकांवर चित्रपट आले. आता त्यात आणखी एका चित्रपटाची भर पडणार आहे. इस्रोचे माजी ज्येष्ठ वैज्ञानिक नॅम्बी नारायण यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपट बनतोय. त्याचा दिग्दर्शक असणार आहे आर. माधवन.

रेहेना है तेरे दिल मे, थ्री इडियटस अशा अनेक चित्रपटांतून आर.माधवन आपल्याला दिसला. आता तो पहिल्यांदाच चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. त्या चित्रपटाचं नाव आहे रॉकेट्राय - नॅम्बी इफेक्ट. या सिनेमाचं सगळं शूट पूर्ण झालं आहे. आता त्याचं पोस्ट प्रॉडक्शन सुरू आहे. हा चित्रपट आता चर्चेत यायचं कारण असं की या सिनेमातला नॅम्बी वठवलेल्या कलाकाराचा फर्स्ट लूक लोकांसमोर आला आहे. या फोटोत दिसतो तोच हा लूक. यातले एक नॅम्बी खरे आहेत आणि एक आहेत सिनेमातले.

नॅम्बी ही इस्रोचे मोठे वैज्ञानिक होते. पण 1994 त्यांच्यावर काही आरोप झाले. त्यानंतर कोर्टात मोठी केस उभी राहिली. 1998 मध्ये सीबीआयने त्यांना क्लिन चीट दिली. यावर त्यांची झालेली मानहानी लक्षात घेऊन केरळ सरकारने त्यांना तातडीने 50 लाख रुपये द्यायचे निर्देश दिले. पण केरळा सरकारने त्यांना एक कोटी 30 लाख देऊ केले. त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. त्या व्यक्तिचा संघर्ष या चित्रपटातून माधवन मांडणार आहे.

हा या चित्रपटाचा आणि त्यातल्या व्यक्तिरेखेचा फर्स्ट लूक आहे. यातला कलाकार आला का लक्षात तुमच्या? त्यांची भूमिकाही साकारतो आहे, आर. माधवन. तेलुगु, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये हा चित्रपट बनणार आहे. पुरेपूर वेळ घेऊन हा चित्रपट बनवला जातोय.