आता संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष भारत सरकारच्या निर्णयाकडे

आता संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष भारत सरकारच्या निर्णयाकडे

IPL 2020 चे आयोजन UAE मध्ये करण्यासाठी BCCI ने अमिराती क्रिकेट बोर्डला (ECB) एक स्वीकृती पत्र पाठवले. IPL चे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी रविवारी याबद्दल माहिती दिली. “आम्ही एमिरेट्स क्रिकेट बोर्डाला स्वीकृतीपत्र पाठवले आहे आणि दोन्ही मंडळे आतापासून या स्पर्धेसाठी एकत्र काम करणार आहेत,” असे पटेल यांनी सांगितले. त्यानंतर सोमवारी हे पत्र मिळाले असून, आता केवळ भारत सरकारच्या निर्णयाकडे लक्ष लागले असल्याचे एमिरेट्स क्रिकेट बोर्डाने सांगितले.

“आम्हाला BCCI कडून IPL आयोजनासंदर्भात अधिकृत पत्र मिळाले असून, आमच्याकडून त्यास कोणतीही हरकत नाही. आता केवळ भारत सरकारच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे कारण यावर अंतिम निर्णय हा भारत सरकार घेणार आहे”, अशी माहिती एमिरेट्स क्रिकेट बोर्डाचे महासचिव मुबश्शीर उस्मानी यांनी दिली. “दोन्ही बोर्डाच्या अधिकाऱ्यांमध्ये सातत्याने चर्चा सुरू आहे. आम्ही एकत्र काम करणार आहोत”, असेही त्यांनी नमूद केले.

करोनाने जगाला हादरवून टाकल्यानंतर ECB ने एप्रिलमध्येच IPL 2020 च्या आयोजनाचा प्रस्ताव पाठवला होता. पण २९ मार्चपासून सुरु होणारे आयपीएल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले होते. मात्र आता सप्टेंबर १९ पासून IPL सुरू होणार आहे. आठही संघ आपल्या संघाचे हंगामपूर्व प्रशिक्षण शिबीर UAE मध्येच आयोजित करतील अशी माहितीही पटेल यांनी दिली. ही शिबीरं सुरक्षित वातावरणात होतील. किमान तीन-चार आठवडे आधी सर्व खेळाडू संघासोबत सराव सुरू करतील.

BCCI च्या या स्वीकृती पत्रावर ECB चे उत्तर आल्यानंतर आता संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष भारत सरकारच्या निर्णयाकडे लागून राहिले आहे. यंदा लीग भारताबाहेर आयोजित करण्याचे ठरले असले, तरी अंतिम निर्णय गृहमंत्रालय देणार आहे.