अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी १५१ नद्या, ८ मोठ्या नद्या, ३ समुद्रांमधून पाणी जमा केलं

अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी  १५१ नद्या, ८ मोठ्या नद्या, ३ समुद्रांमधून पाणी जमा केलं

अयोध्येत राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा बुधवारी, ५ ऑगस्ट रोजी होत आहे. भूमिपूजन सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. अयोध्येतील राम मंदिर उभारण्यास सुरूवात होण्या अगोदर लोकं विविध मार्गांनी आपली भावना व्यक्त करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर दोन भाऊ चर्चेत आले आहेत. ज्यांनी देशभरातील १५० पेक्षा जास्त नद्यांचे पाणी जमा करून, राम मंदिराचा भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्या गाठली आहे.

यातील राधेश्याम पांडे सांगतात की, १९६८ पासून आम्ही १५१ नद्या, ८ मोठ्या नद्या, ३ समुद्रांमधून पाणी जमा केलं आहे. तसेच, श्रीलंकेतील १६ ठिकाणाहून माती गोळा केली आहे. राम मंदिर निर्माणासाठी देशभरातील विविध भागांमधून सिद्ध व शक्ती पीठांची माती व नद्यांचे पवित्र जल अयोध्येत पोहचवले जात आहे. नद्यांच्या पाण्याचा व मातीचा उपयोग भूमिपूजनवेळी केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. भूमिपूजनासाठी पश्चिम बंगाल व बिहारमधून देखील माती व नद्यांचे पाणी अयोध्येत पोहचवले जात आहे.

राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी छत्तीसगडमधील एक मुस्लीम भाविक ८०० किलोमीटरचा प्रवास करुन अयोध्या येथील सोहळ्यास हजर राहणार आहे. मोहम्मद फैज खान असं या भाविकाचं नाव असून तो छत्तीसगडमधील चांदखुरी गावातला रहिवासी आहे. या सोहळ्यासाठी मोहम्मदने आपल्या गावातली माती आणली आहे, भगवान श्रीराम यांची आई कौसल्या यांचं जन्मस्थान म्हणून हे गाव प्रसिद्ध आहे. विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवक्ते अश्विनी मिश्रा यांनी “राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी संगमावरील माती आणि पवित्र जल वापरायला हवं, असं विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष स्व. अशोक सिंघल यांनी म्हटलं होतं. ही माती आणणाऱ्यांची नावं निश्चित करण्यात येणार असून, लवकरच त्याची घोषणा करण्यात येईल,” असं या अगोदर सांगितलं होतं.